
सर्वत्र होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकादमीच्या गौरव संजय चांदणे याने दिनांक २७ जून ते ०७ जुलै २०२५ दरम्यान बर्मिंगहॅम (यूएसए) / अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक पोलिस गेम्समध्ये भारतीय पोलीस संघाला वैयक्तिक रौप्य पदक प्राप्त करून दिले.गौरवला लहानपणापासूनच खेळाची आवड होती, वयाच्या 14 व्या वर्षी त्याने एकलव्य धनुर्विद्या अकादमी नांदगाव खंडेश्वर येथे धनुर्विद्या खेळाची सुरवात शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री सदानंद जाधव सर व एन.आय.एस. प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनात केली.त्यानी आतापर्यंत अनेक सिनिअर, ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत पदके प्राप्त केले.नुकत्याच उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत सुध्दा गौरव चांदणेला सुवर्ण व कांस्य पदक मिळाले. सण 2023-24 मध्ये गौरवला महाराष्ट्र शासनाने जिल्हा गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.गौरव चांदणे सध्या दिल्ली येथे आयटीबीपी मधे कार्यरत आहे. दिल्ली येथील पोलीस सेंटर मध्ये गौरवचा सराव सुरू आहे,भविष्यात ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून गौरवचा सराव सुरु आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक मार्गदर्शक राष्ट्रपती व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री सदानंद जाधव , जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव ,महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर तसेच एकलव्य क्रीडा अकादमीचे उत्तमराव मुरादे, राजेंद्र लवंगे, विशाल ढवळे, विलास मारोटकर, अनुप काकडे, महेंद्र मेटकर ,अनिल निकोडे,पवन जाधव यांनी व अकादमीचे पालक , खेळाडू यांनी अभिनंदन केले.