
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
संतांची भूमी असलेल्या जिल्ह्यात गाडगे महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पर्यावरण विकासाचा संदेश दिला आहे. महापुरूषांनी दिलेला मोलाची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणून पर्यावरणाचा दूत म्हणून कार्य करावे, यात विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.नांदगाव पेठ औद्योगिक परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार राजेश वानखडे, माहुलीच्या सरपंच प्रिती बुंदिले, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राम लंके, विभागीय वन अधिकारी दर्शना पाटील, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, सहायक वनसंरक्षक पुष्पलता बोंडे, गटविकास अधिकारी श्री. सुपे, वाईल्डलाईफ अवेअरनेस रिसर्च ॲण्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष निलेश कांचनपुरे, सचिव डॉ. वडतकर, राघवेंद्र नांदे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा संकल्प प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. वातावरणातील बदल हा आता प्रत्येक नागरिकाला भेडसावणारा प्रश्न झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून हरीत महाराष्ट्र उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण करून नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे.
पर्यावरणाच्या रक्षणासाठी देशपातळीवर एक पेड माँ के नाम उपक्रम राबविण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. या आवाहनानुसार पुढाकार घेऊन एक झाड लावून त्याचे संगोपन करावे.आमदार श्री. वानखेडे यांनी आईच्या स्मरणार्थ झाड लावण्याचा उपक्रमात नागरिकांनी झाडे लावावीत. वृक्षारोपणामुळे पर्यावरण संतुलीत राहण्यास मदत होणार आहे. केवळ झाडे लावल्याने निसर्गातील सर्व बाबींचे आपोआप संतुलन होते. त्यासाठी जिल्ह्यात एक लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करावे. तसेच प्रशासनातर्फे होणाऱ्या वृक्षारोपणात सहभागी होऊन नागरिकांनी प्रतिसाद द्यावा,असे आवाहन केले.सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवर आणि सहभागी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. या उपक्रमात भारतीय महाविद्यालय, स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, प्रा. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, तक्षशिला महाविद्यालय, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले. महसूल विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, अमरावती महापालिका, रास्तभाव दुकानदार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. अनिल भटकर यांनी आभार मानले.