
वनविभागाकडे नुकसानभरपाईची मागणी
वनविभागाचे अधिकारी झाले गायब
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्या खरीप हंगामाची पेरणी जवळपास पूर्ण झाली असून शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, भुईमूग अशा पारंपरिक पिकांची पेरणी केली आहे. मात्र, पेरणीनंतर डुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत.विशेषतः तूर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे अनेक शेतकऱ्यांना एकाच पिकाची दोन वेळा पेरणी करावी लागत आहे.डुकरांनी तुर पाडण्याचा अक्षरशः ‘कार्यक्रम’ लावला असून दिवसेंदिवस त्यांचा त्रास वाढतो आहे.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊनही कोणताही अधिकारी तालुक्यात फिरकायला तयार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.आणि रात्री अपरात्री शेतकऱ्यांना शेतात जाऊन तुरीचे रक्षण करावे लागत आहे. काही शेतकरी आपले जीव धोक्यात घालून शेतात रात्री जागून पहारा देत आहेत. डुकरांची संख्या एवढी वाढली आहे की शेतकऱ्यांना एकटे शेतात जायला देखील भीती वाटते. डुकरांच्या हल्ल्यामुळे शेतकरी जखमी होण्याचाही धोका निर्माण झाला आहे.
पिकांचे रक्षण करण्यासाठी काही शेतकऱ्यांनी शेताच्या आजूबाजूला लोखंडी तार लावून त्याला बॅटरीचा करंट जोडला आहे, तरीही डुकरे शेतात शिरून तुर पाडत आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान दिवसेंदिवस वाढत आहे.या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी वनविभागाकडे नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच डुकरांनी नुकसान केलेल्या पिकांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.वनविभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी आक्रमक आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
👌👍