नोकरी मिळाल्याने दिवाळीत तरुणांचा आनंद द्विगुणित
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
महावितरणच्या विद्युत सहाय्यकांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या १८० विद्युत सहाय्यकांची अमरावती परिमंडळात नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे तरूणांना नोकरी आणि महावितरणला अतीरिक्त मनुष्यबळ मिळाले आहे. याचा फायदा ग्राहक सेवा अधिक बळकट करण्यासाठी होणार असल्याचा विश्वास मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी व्यक्त केला आहे.महावितरणकडून ५ हजार ३८१ पदासाठी जाहिरात क्र. ०६/२०२३ अन्वये दिनांक २० ते २२ मे ला विद्युत सहाय्यक या पदासाठी ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली होती.निवड चाचणी आणि कागदपत्राच्या तपासणीअंती निवड झालेल्या उमेदवाराची परिमंडळनिहाय पदस्थापना करण्यात आली आहे.
अमरावती परिमंडळात १८० विद्युत सहाय्यक रूजू झाले असून ,यात अमरावती जिल्ह्यात ८८ आणि यवतमाळ जिल्ह्यात ९२ विद्युत सहाय्यकाचा समावेश आहे.शेकडो किलोमीटर पसरले महावितरणच्या वीज जाळ्याला नव्या रूजू झालेल्या विद्युत सहाय्यकांमुळे बळ मिळणार असून वीज पुरवठा व्यवस्थापन, ग्रामीण भागातील वीज जाळे दुरुस्ती, फॉल्ट निवारण आणि वीजपुरवठ्याची सातत्यता राखण्यासाठी या नव्या कर्मचाऱ्यांचा मोठा हातभार लागणार असल्याचे अधीक्षक अभियंता दिपक देवहाते म्हणाले. ‘महावितरण परिवारात’ सामील झालेल्या विद्युत सहाय्यकांचा महावितरणमध्ये स्वागत करण्यात आले,शिवाय दिवाळीपूर्वी मिळालेल्या या नियुक्त्यांमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.महावितरणच्य या पदभरतीमुळे केवळ रोजगार निर्मितीलाच चालना मिळालेली नाही, तर दर्जेदार व अखंडित वीजपुरवठ्यासाठी मनुष्यबळाची ताकदही अधिक वाढली आहे.
