
सर्वत्र होत आहे अभिनंदनाचा वर्षाव
वणी / तालुका प्रतिनिधी
पुणे येथील ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्राच्या द्वारे भारतीय संस्कृती विषयक वैशिष्ट्यपूर्ण लेखन आणि व्याख्यान प्रवचनात्मक प्रबोधन कार्यासाठी तसेच युट्युब सारख्या अत्याधुनिक माध्यमातून जगभरात गाणपत्य तत्वज्ञान आणि संस्कृत साहित्याच्या प्रचार प्रसारासाठी विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांना शारदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी श्री योगीराज वेद विज्ञान आश्रम कासारवाडी येथील श्री चैतन्य नारायण काळे गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती श्री दत्तात्रेय मनोहर साधले यांना वेद मार्ग दीपस्तंभ पुरस्कार तथा अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर येथील दाते पंचांगकर्ते श्री मोहन धुंडिराज शास्त्री दाते यांना रत्नमाला पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले.सुप्रसिद्ध ज्योतिर्विदा शुभांगीताई पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे सर्वेसर्वा वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते, मालती तांबोळकर,अंजली पोतदार यांच्या विशेष उपस्थितीत सर्व मान्यवरांना तथा केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांमध्ये यश प्राप्त केलेल्या अनेक विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.