अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
म्हणतात ना गेल्यानंतर माणसाची किंमत कळते तेच खरे ! श्रीरंग हिर्लेकर दादांच्या हिंदुस्तान मध्ये आलेल्या डॉ .राम नवसळकरांच्या लेखानी या गोष्टीचा विचार करायला भाग पाडले. आजपर्यंत घरी असलेली साथसंगत ही किती मौल्यवान आणि दुर्मिळ होती याची जाणीव झाली .स्वतःची तयारी न दाखवता ,केवळ माझा तबला, माझी संगत, ही भावना न ठेवता ,आपला संपूर्ण कार्यक्रमच चांगला व्हायला हवा, केवळ मलाच नव्हे तर संगतीच्या कोणत्याही गायकाला समर्पक संगत मिळावी म्हणून झटणारा वादक दुर्मिळच! आमच्या वडिलांचा आदर्श समोर ठेवत, चांगला ठेका बांधता यावा याच इच्छेने त्याने साथसंगतीकडे बघितले. यामुळे गायनाच्या प्रत्येक शैलीला समजून संगत करणारा हसरा साथीदार हरपला या विचाराने मन विलक्षण दु:खी होते.कोणत्याही वाद्याला साथ संगत करणे आणि गाण्याला साथ संगत करणे यात बराच फरक आहे. कोणत्याही गाण्याला साथसंगत करतांना गायकाला आपला मुक्काम दिसणे, समेची जागा दिसणे, इतके समर्पक, सुसंगत वादन असायला हवे. राम दादाच्या वादनात कधीही मला किती येते आणि मला ते ,लोकांसमोर सादर करून वाहवा मिळवायची आहे ,हा हेतू कधीच नव्हता .याचा अर्थ बऱ्याच लोकांचा समज असाही होता की, याला तयारीचा तबला किंवा तयारीचे बोल वाजवताच येत नाहीत. पण संयमित साथ कशी असते याचे, त्याची संगत म्हणजे उत्तम उदाहरण होते, ( होते म्हणण्यापेक्षा मी आहे असे म्हणेन) असे मला वाटते. “मीरा तुझे गाणे पूर्णतः तबल्यामध्ये बांधले आहे ‘असे मला प्रसिद्ध संगीत तज्ञ आणि विचारवंत शामराव कुलकर्णी , पुण्याला म्हणाले होते .याचा अर्थ मला उशिरा का होईना , आज कळतो आहे .संयमित ठेक्याबरोबरची ख्यालाची समर्पक भरण , त्यातील लयकारी ह्यामुळे गाण्यातली सहजता शक्य असते. अर्थात गाण्यातली Ease याचा फार व्यापक अर्थ आहे .कोणताही आलाप किंवा कोणतीही तान घेतांना म्हणजे कोणताही विचार घेतांना मध्येच संगतकाराने आपल्याला सुचेल ते वाजवणे ,यामुळे प्रतिभेचा विचार कुठेतरी थांबल्यासारखा होतो. याहीपेक्षा विशिष्ट विचार सुरू असतांना नाद कितपत ठेवायचा हे सुद्धा एक तंत्र आहे ,ती एक समज आहे .हे तर ख्यालाचे झाले. पण बंदिश सुरू झाल्यानंतर, त्याचा ठेका केव्हा सुरू झाला हे कळतही नव्हते. ,ठेका सुरू झाल्यावर थोडा वेळ तो ठेका ऐकावासा वाटे, हे शब्दात व्यक्त करता येण्यासारखे नाही .तर तो अनुभवही अत्यंत सुखद होता .आजच्या ट्रेंड प्रमाणे द्रुत बंदिश सुरू झाल्यानंतर सुरुवातीला लगेच एक बोल वाजवून वाहवा घेणे हे त्याने कधीही केले नाही म्हणजे गाणे उंचावण्यासाठी गायकाच्या विचारांना योग्य न्याय देण्यासाठी आपल्यावर कमी तयारीचा तबलावादक हा ठपका घेणारा संगतकार निराळाच आणि विरळा! पण त्याच्या ठेक्याची किंमत ज्याला कळली त्याच गायकांनी त्याच्या वादनाचा आनंद घेतला. नागपूरच्या गायिका सौ साधनाताई शिलेदार यांचे अनेक वेळा त्याच्या तबला संगतीतील गाणे ऐकण्याचा योग आला. कितीही आडलय असो किंवा आड मात्रेचा ताल असो, मुक्काम मात्र ठरलेला होता. या भावना केवळ एक गायकच समजू शकेल.मला मिळालेल्या तालमी नुसार ,प्रत्येक रागाच्या ख्यालाची एक विशिष्ट लय असते ती लय मिळाल्याशिवाय गाण्यामध्ये चैनदारी येत नाही .यामध्ये ‘आम्ही कोणत्याही लयीत गावू शकतो ‘हा भाग वेगळा! पण ख्यालाची जी एक अंगभूत लय असते आणि ती मिळाल्याशिवाय गाणे निभावून नेणे कठीण होते . वरील सर्व गोष्टींचा अनुभव रामदादाच्या साथीमध्ये येत होता हा माझा अनुभव आहे .अजातशत्रू अशा स्वभावाप्रमाणे कोणाशीही स्पर्धा न करता, तबला साथ संगत हा एक वेगळा प्रांत आहे ,हा परिपाठ त्याने घालून दिला. तबलावादकाने केवळ तयारीचा तबला वाजवूनच प्रसिद्ध व्हावे असे नाही. त्याला मिळालेल्या थोडक्या आयुष्यात फक्त आयुष्य असो किंवा तबला साथ संगत असो, केवळ दुसऱ्यांसाठी कायम आपण असावे असा धडा दिला. अमरावतीतील म्हणा किंवा इतर ठिकाणी असलेले जे ,रामदादाच्या संगती सोबत किमान प्रॅक्टिस मध्ये गायलेले असतील ,त्यांनी हा अनुभव निश्चितच घेतला असेल पण हेही तितके सत्य आहे की आता पुन्हा ती साथ न मिळणे !कारण लयीशी संवाद साधणारे असे ‘समज कमावलेले संगतकार ‘ दुर्मिळ झालेले असतांना त्याचे स्वतःहून निघून जाणे हे चटका लावून जाणारे तर आहेच, पण माझ्यासारखे संगीत साधक आता लयदार ,भरीव ठेक्याला मुकले हेही तितकेच कटू सत्य आहे.आज माझ्या गाण्याचा भरीव पाया असलेला माझा भाऊ रामदादा (राम नवसाळकर ) यांच्या तबल्याबद्दल, त्याच्या पश्चात माझे विचार मांडण्यासाठी हा लेखन प्रपंच करावा लागला यासारखे माझे कोणते दुर्दैव नसावे !
तुझीच बहीण
मीरा नवसाळकर – पहूरकर
