अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
“विदर्भाच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान – ऐतिहासिक अभ्यास” या विषयावर सखोल संशोधन पूर्ण केल्याबद्दल डॉ. पंडीत चंपतराव भोयर यांना २३ फेब्रुवारी रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्याकडून तत्त्वज्ञान विद्यावाचस्पती (पीएच.डी.) ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी प्रदान करण्यात आली आहे. दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठाने अधिकृत अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. डॉ. भोयर यांनी आपल्या संशोधनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा विदर्भाच्या सामाजिक व सांस्कृतिक विकासावर झालेला परिणाम ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यासला आहे. संशोधनात संदर्भाधारित मांडणी, शास्त्रशुद्ध विश्लेषण आणि समाजाभिमुख दृष्टीकोन यांचा समन्वय साधण्यात आला आहे. विविध ऐतिहासिक कागदपत्रे, संशोधनग्रंथ आणि सामाजिक चळवळींचा सखोल अभ्यास करून त्यांनी आपला प्रबंध अधिक परिपूर्ण केला आहे.संशोधन कार्यासाठी त्यांना प्रा. ओमराज गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले. कठोर परिश्रम, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांमुळे त्यांनी हे शैक्षणिक यश संपादन केले आहे. यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अध्यापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना “आदर्श शिक्षक” हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल खा. बळवंत वानखडे यांच्या सह कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते,डॉ. मिनल मालधुरे, प्रा.डाॅ ओमराज गजभिये, प्रा. डॉ. संतोष बनसोड, प्रा. डॉ. नितीन कोळी (परीक्षा नियंत्रक), तसेच सावर्डी येथील माजी सरपंच राजकुमार मेश्राम, माजी सरपंच राहुल उके, उदखेड येथील माजी सरपंच प्रकाश भोयर, मधुकर वाकडे, शेखर बडगे आणि मिलिंद वाहुरवाघ यांनी डॉ. भोयर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.डॉ.भोयर यांच्या या यशामुळे त्यांच्या संस्थेचा, गावाचा आणि जिल्ह्याचा गौरव वाढला असून, भविष्यातही ते संशोधन, अध्यापन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.डॉ. पंडीत चंपतराव भोयर यांना त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक आणि सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
