विभागीय नंतर राज्यातही यशाची सलग परंपरा कायम
आधुनिक सुविधांच्या बळावर राज्यातील उत्कृष्ट संस्थांमध्ये स्थान
नांदगाव खंडेश्वर – (ता. प्र.)
कष्ट, नाविन्य आणि टीमवर्कची सांगड घातली तर यश नक्की मिळते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे नांदगाव खंडेश्वर येथील एकनाथराव रानडे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ! राज्यभरातील संस्थांमध्ये स्पर्धा असतांना या आयटीआयने थेट राज्यात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेत अमरावती जिल्ह्याचा मान उंचावला आहे.मुंबई येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची “राज्यस्तरीय उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरस्कार”साठी निवड करण्यात आली. सन 2023–24 साठी झालेल्या या प्रतिष्ठेच्या निवड प्रक्रियेत नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने राज्यात तिसरा क्रमांक पटकावत मोठा मान मिळवला आहे. या पुरस्कारात प्रशस्तीपत्रासह २ लाख रुपयांच्या रोख पारितोषिकाचा समावेश आहे. संस्थेत नाविन्यपूर्ण उपक्रम, अत्याधुनिक सुविधा आणि १०० टक्के प्रवेश क्षमता पूर्ण करण्यासोबतच प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. स्मार्ट क्लासरूम, सीसीटीव्ही निगराणी, खेळाचे मैदान, जिम, शुद्ध पाण्याची व्यवस्था अशा विविध सुविधा उभारण्यात आल्या. तत्कालीन सहसंचालक प्रदीप घुले व विद्यमान सहसंचालक अनंत सोमकुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य नंदनसिंह भुकवाल यांच्या नेतृत्वात ही प्रगती साध्य झाली. संचालनालयामार्फत 27 मार्च रोजी घोषित झालेल्या निकालात नांदगाव खंडेश्वर आयटीआयची राज्यात तृतीय क्रमांकासाठी निवड झाली. विशेष म्हणजे, यापूर्वीही 2021-22 मध्ये नांदगाव खंडेश्वर आयटीआयला विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला होता. तसेच 2024 मध्ये मुंबईतील डिपेक्स राज्यस्तरीय तंत्र प्रदर्शनात आयटीआय गटातून “शेतकरी मित्र” यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला होता. विभागीय आणि राज्यस्तरावर सलग पुरस्कार पटकावणारी जिल्ह्यातील ही एकमेव आयटीआय ठरली आहे.या यशाबद्दल प्रभारी प्राचार्य सुरेश मेंढे, शिल्प निदेशक तुषार जैन, राजकुमार धोटे, प्रफुल्ल कचरे, वैभव जाधव, निलेश देऊळकर, राम इखार, शहजाद खान, सुशिल सरोदे, सागर डांगे, चिन्मय दहाट, वैभव केणे, प्रशांत पोच्ची, सचिन वाहणे, सचिन दुवदने, मयुरी वसुले, रूचिका डोरस, संगिता बिबेकर, दिपाली लोखंडे, रूपाली लांडे, कार्यालयीन कर्मचारी अनंत खेडकर, निलेश खंडार, मनोज पकडे, राजकुमार कांबळे, गौरव मोगरे व प्रशिक्षणार्थ्यांनी आनंद व्यक्त करत संस्थेचे अभिनंदन केले. ही कामगिरी नांदगाव खंडेश्वरसाठी अभिमानाची ठरली असून भविष्यात आणखी मोठी झेप घेण्याचा संस्थेचा निर्धार आहे.
सर्वांच्या अथक प्रयत्नातून मिळाला मानाचा बहुमान
तत्कालीन कार्यरत असलेले कर्मचारी व सद्याचे शिल्पनिदेशक – कर्मचारी तथा प्रशिक्षणार्थ्यांचे सहकार्य आणि सातत्यपूर्ण उपक्रम यामुळेच हा पुरस्कार मिळू शकला. हा सन्मान संपूर्ण संस्थेच्या टीमवर्कचा आहे.
नंदनसिंह भुकवाल
प्राचार्य, आयटीआय नांदगाव खंडेश्वर
