
‘माझी सुंदर शाळा’ अभियान, सूतगिरणी व रोपवाटिकेची पाहणी
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूररेल्वे उपविभागातील नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिक्षण, उद्योग, वनीकरण, कृषी आणि प्रशासकीय कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला.
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियानाला प्रोत्साहन:
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा पीएम श्री दाभा येथे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी भेट दिली. या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हाधिकारी यांनी या शाळेतील विविध अभिनव उपक्रमांची माहिती जाणून घेतली. शाळेतील आयसीटी (ICT) लॅबला भेट दिली. यावेळी त्यांनी ‘मिशन आरंभ’ अंतर्गत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांना शैक्षणिक कार्याविषयी सूचना दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांचे ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविल्याबाबत अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डीजी कॉटसिन सूतगिरणीची पाहणी:
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दाभा येथील डीजी कॉटसिन (DEGEE cotsyn) सूतगिरणीला भेट दिली. येथे त्यांनी वस्त्रोद्योग मूल्य साखळी (Textile industry Value chain) बाबत सविस्तर माहिती घेतली. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
सामाजिक वनीकरण आणि मनरेगा मजुरांशी संवाद:
माहुली चोर येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिकेलाही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी रोपवाटिका प्रकल्पाबद्दल चर्चा केली. तिथे काम करणाऱ्या मनरेगा मजुरांशी जिल्हाधिकारी यांनी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामरोजगार सेवकांचे मस्टर तपासले आणि त्यांना सनकोट, टी-शर्ट व कॅपचे वाटप करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेनुसार वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
कृषी क्षेत्राचा आढावा आणि गोडाऊन पाहणी:
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नवीन गोडाऊनची पाहणी करून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ज्वारी खरेदी केंद्राला भेट दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली.
विभागप्रमुखांची आढावा बैठक:
उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदूर रेल्वे येथे उपविभागातील तिन्ही तालुक्यातील विभागप्रमुखांची यावेळी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद, वनविभाग, शिक्षण विभाग, आणि भूमिअभिलेख विभाग या प्रमुख विभागांच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधितांना त्यांनी निर्देश दिले.
एफपीओ (FPO) शेतकऱ्यांशी चर्चा:
चांदूर रेल्वे तालुक्यात लखदातार येथे स्मार्ट अंतर्गत उभारण्यात आलेल्या एफपीओ (Farmer Producer Organisation) यांच्या गोडाऊन व प्रोसेसिंग युनिटला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. एफपीओला येणाऱ्या अडचणी आणि इतर विषयांवर शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून, त्यांच्या समस्यांची नोंद घेतली.उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, नांदगाव खंडेश्वर तहसीलदार अश्विनी जाधव, धामणगाव रेल्वे तहसीलदार अभय घोरपडे,चांदुर रेल्वे तहसीलदार पूजा माटोडे, मुख्याधिकारी नगरपरिषद चांदुर रेल्वे विकास खंडारे, नांदगाव खंडेश्वर गट विकास अधिकारी स्नेहल शेलार, चांदुर रेल्वे गट विकास अधिकारी संजय खारकर तसेच संबंधित विभाग प्रमुख, अधिकारी यावेळी उपस्थित होते.