
धारणी / तालुका प्रतिनिधी
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील तिसऱ्या श्रावण सोमवारी पारंपरिक धारगड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दोन दिवस (रविवार व सोमवार) चाललेल्या या यात्रेत हजारो श्रद्धाळूंनी पुनर्वसित धारगड गावातील महादेव मंदिरात दर्शन घेतले.यात्रेदरम्यान भक्तांची मोठी गर्दी होत असली, तरी काही यात्रेकरूंकडून दारू, गांजा, घुटका, तंबाखू, सिगारेट तसेच प्लास्टिक यांसारख्या प्रदूषणकारक वस्तूंची ने-आण केली जाते. यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल परिसरावर आणि वन्यजीवांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते.ही परिस्थिती लक्षात घेऊन कार्स अमरावती व भूगोल विभाग, भारतीय महाविद्यालय, मोर्शी यांच्या ७६ स्वयंसेवकांनी यंदाही वन विभागाच्या सहकार्याने तपासणी मोहिम राबवली. यात्रेच्या दोन दिवसांत सलग ३८ तास स्वयंसेवकांनी प्रत्येक प्रवेशद्वारावर कसून तपासणी करून दारू, तंबाखूजन्य पदार्थ व प्लास्टिक रोखण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या या उपक्रमामुळे यात्रेदरम्यान निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात यश आले.सुमारे १८ किलोमीटर आत जंगल परिसरात पार पडणाऱ्या या यात्रेमुळे व्याघ्र प्रकल्पाचे नुकसान होत असल्याचे वन विभागाने मान्य केले आहे. काही बेफिकीर यात्रेकरूंमुळे वन्यजीवांच्या हालचालीत व्यत्यय येतो, तसेच परिसरात प्लास्टिक कचरा साचतो.
मात्र यंदा स्वयंसेवक आणि अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. आनंद रेड्डी म्हणाले, “धारगड यात्रा ही धार्मिक परंपरा आहे, पण ती पर्यावरणस्नेही व्हावी यासाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी लागते. यंदा स्वयंसेवकांनी उत्कृष्ट कामगिरी केली.””महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांनी सामाजिक आणि पर्यावरणीय जवाबदारी सुद्धा स्वीकारावी या करिता महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थी दशेतच त्यांच्यावर असे संस्कार व्हावे हेच आमचे प्रयत्न असतात.” असे मत डॉ. संतोष आगरकर, प्राचार्य, भारतीय महाविद्यालय, मोर्शी यांनी व्यक्त केले.कार्स अमरावती व भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. सावन देशमुख यांनी सांगितले, “स्वयंसेवकांनी अहोरात्र ३८ तास सेवा बजावली. तरुणाईने समाजहिताचे कार्य करण्याची खरी दिशा यामधून दिसते.”प्रा. डॉ. सावन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक अक्षय लुंगे, इरफान शेख, भूषण खडसे, सौरभ घडेकर, रूपेश वानखडे, आवेश शेख, सुमीत पळसपगार, अनिकेत भुयार, श्याम चौधरी, अनिकेत साऊत, महेश बाभूळे, अभय दामेधर, विनय पवार, कु. दिव्या कुमरे, रुद्राक्षी नेवारे, कल्याणी महल्ले, लक्ष्मी विश्वकर्मा, सायली गायकी, पूनम टोहणे आणि इतर स्वयंसेवकांनी यात्रेदरम्यान निस्वार्थी सेवा दिली.एका स्वयंसेवकाने अनुभव सांगितला, “लोकांना थांबवून प्लास्टिक व तंबाखूजन्य पदार्थ जमा करणे सोपे नव्हते. पण जंगल आणि व्याघ्र प्रकल्प वाचवण्यासाठी आम्ही हे कर्तव्य म्हणून केले.”या मोहिमेत मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक श्री. आनंद रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आकोट वन विभागाचे विभागीय वनसंरक्षक श्री. राहुल सिंह टोलिया, उपवनसंरक्षक श्री. गणेश टेकाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. भानुदास पवार, कु. हर्षाली रिठे, श्री. रविंद्र खेरडे तसेच कार्स अमरावती चे अध्यक्ष आणि भूगोल विभाग प्रमुख डॉ. सावन देशमुख, निसर्ग कट्टा चे अध्यक्ष श्री. अमोल सावंत, अमरावती ग्रामीण पोलीस विभाग, अमरावती ट्राफिक पोलीस, आरोग्य विभाग यांनी यात्रेवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य केले.स्वयंसेवकांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, पर्यावरण संवर्धनासाठी धारगड यात्रेत केलेले हे प्रयत्न आदर्श ठरत आहेत.