संत बालवामन महाराजांच्या मार्गदर्शनात श्रीमद् भागवत व्यसनमुक्ती सप्ताह उत्साहात संपन्न
नांदगाव खंडेश्वर /उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र सावणेर येथे दि. ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान श्रीमद् भागवत व्यसनमुक्ती सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला. संत बालवामन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुरु निरंजन नाथ यांच्या अमृतमय वाणीतून भागवत कथा आणि कीर्तनांचा कार्यक्रम सात दिवस रंगला.या सप्ताहादरम्यान मुंबई येथील डॉ. शुभाष भोयर व डॉ. स्मिता भोयर यांनी भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर आयोजित केले. शेकडो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. अध्यात्मासोबतच आरोग्याची जोड देत सप्ताहाने सामाजिक संदेशही दिला.

दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ह.भ.प. मसाये महाराज यांचे काल्याचे कीर्तन भाविकांना मंत्रमुग्ध करून गेले. कीर्तनातून व्यसनमुक्ती, सदाचार आणि नामस्मरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
पालखी मिरवणुकीत शेकडो दिंड्यांचा सहभाग; जयघोषाने दुमदुमला परिसर
कीर्तनानंतर श्रींच्या पालखीची भव्य मिरवणूक गावातून दिंडी, पताका आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात काढण्यात आली. अमरावती, यवतमाळ, वाशीम, धारणी, वर्धा आदी परिसरातून आलेल्या शेकडो दिंड्यांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला.संत वामन महाराज, संत गणपत महाराज आणि संत खंडेश्वर महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. गावकऱ्यांनी जागोजागी कमानी सजवून तसेच चहा-नाष्ट्याची व्यवस्था करून भाविकांचे स्वागत केले. हरीनामाच्या गजरात श्रींची पालखी गोरक्षण परिसरात पोहोचताच दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.सप्ताहादरम्यान विविध संत-महंत, समाजसेवक व लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या. आमदार प्रतापदादा अडसड, अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी, गटनेते चेतन गावडे, प्रशांत शेगोकार यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, बिट जमादार तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.संत वामन महाराज संस्थानचे विश्वस्त, गावकरी मंडळी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे हा भव्य आध्यात्मिक सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. श्री क्षेत्र सावणेर येथे उसळलेला भाविकांचा जनसागर आणि भक्तिरसात रंगलेले वातावरण हीच या सप्ताहाची खरी फलश्रुती ठरली.
