
देशाच्या प्रगतीमध्ये आणि धोरण निश्चितीमध्ये सांख्यिकीचे महत्व अनमोल
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबीस यांचा जन्मदिवस 29 जून भारत सरकारव्दारे ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ म्हणुन घोषित करण्यात आलेला आहे. आर्थिक योजना आणि सांख्यिकी विकास या क्षेत्रातील प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या कार्याचा गौरव म्हणून देशात सर्वत्र 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय व उपायुक्त (नियोजन) विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिन’ साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात प्रारंभी संख्याशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबीस यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमाला अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, अमरावतीच्या सहसंचालक संध्या गवई, सांख्यिकी उपसंचालक केतकी धरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच माजी अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.प्रत्येक देशाच्या प्रगतीमध्ये आणि धोरण निश्चितीमध्ये सांख्यिकीचे महत्व अनमोल असते.
सांख्यिकीचा इतिहास हा केवळ आकडे गोळा करण्यापुरता मर्यादित नसून तो देशाला नियोजनाची आणि विकासाची दिशा देणारा आहे. एकेकाळी केवळ आकडे गोळा करण्याचे एक साधन म्हणून पाहिली जाणारी ही सांख्यिकी आज आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये निर्णय प्रक्रियेपासून (Decision Making) ते भविष्याच्या अंदाजापर्यंत (Forecasting) एक अविभाज्य अंग बनली आहे. आज 21 व्या शतकात आपण माहिती युगात जगत आहोत. इंटरनेट, स्मार्टफोन आणि विविधि डिजीटल उपकरणांमुळे प्रचंड प्रमाणात विदेची (Data) साठवण होत आहे. ही साठलेली माहिती समजून घेणे, तिचे विश्लेषण करणे आणि त्यातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढणे यामध्ये सांख्यिकीची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. सांख्यिकी आपल्याला या माहितीच्या महापुरातून मार्ग काढण्यास, महत्वाचे नमूने ओळखण्यास मदत करते. सामाजिक सर्वेक्षण, रोजगार, शिक्षण, वैज्ञानिक संशोधन, हवामान अभ्यास, पशुधन सर्वेक्षण, वन सर्वेक्षण, व्यवसाय व अर्थव्यवस्थेतील सांख्यिकी आदी विविध महत्वाच्या क्षेत्रात सांख्यिकीचे महत्व अत्यंत महत्वाचे आहे. समाजातील प्रत्येक समस्या समजून घेण्यासाठी सांख्यिकी अनिवार्य आहे. प्राप्त डेटाच्या आधारे अचूक विश्लेषण, निष्कर्ष व त्यानुषंगाने सरकार व प्रशासनाकडून धोरणे ठरविण्यासाठी तिची मदत होते, असे सांख्यिकीशास्त्राचे तज्ञ प्रा. डॉ. हरीहर लुंगे, डॉ. उमेश काळे, सहा. प्राध्यापक ज्ञानेश्वर गटकर यांनी आपल्या भाषणात सांगून सांख्यिकीचे महत्व विशद केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन विभागाच्या संशोधन अधिकारी श्रीमती रेखा गुरव यांनी तर सहाय्यक संशोधन अधिकारी नरेंद्र गायकवाड आभार मानले