नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जिल्हा अमरावती शाखा नांदगाव खंडेश्वर यांच्या वतीने नांदगाव खंडेश्वर येथे बस डेपो उभारण्याची मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.विद्यार्थी, नागरिक तसेच प्रवासी वर्गांना दररोज प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागते. बस डेपो नसल्यामुळे बस थांबण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नाही. परिणामी पावसाळ्यात प्रवाशांना भिजत उभे राहावे लागते, तर उन्हाळ्यात प्रखर उन्हाचा त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थ्यांना बसमध्ये चढ-उतार करताना रस्त्यावरच थांबावे लागते, ज्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.नांदगाव खंडेश्वर तालुका हा शैक्षणिक दृष्टीने वाढत असलेला भाग असून येथे अनेक विद्यार्थी दररोज प्रवास करतात. त्यामुळे बस डेपो उभारल्यास विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.यावेळी नगरमंत्री ओम मोरे,अभिषेक पवार,सुमित नागपुरे,आनंद जयस्वाल, साहिल जांभुळकर, आदित्य गवळी, अभय राजूरकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
