परतवाडा / नितीन दुर्बुडे
ग्रामीण भागात शासनाने थकीत मालमत्ता कराच्या एकूण रक्कमेवर ५०टक्के सवलत दिल्याप्रमाणे तीच सवलत शहरात लागू करावी, यामुळे नगर परिषद अचलपूर येथे राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत थकीत मालमत्ता करावर ५० टक्के सवलत देण्यात यावी तसेच सदर योजनेची मुदत वाढविण्यात यावी, या मागणीसंदर्भात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. मुख्य कार्यपालन अधिकारी, नगरपालिका अचलपूर यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती परतवाडा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गवई यांनी दिली आहे.नगर परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेअंतर्गत सध्या थकीत मालमत्ता करावरील व्याज व शास्तीच्या रकमेवर सवलत देण्यात येत आहे. मात्र अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना संपूर्ण थकीत कराची रक्कम एकरकमी भरणे कठीण जात असल्याने कर भरण्याची प्रक्रिया अडचणीची ठरत आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा व कर वसुलीही वाढावी या उद्देशाने थकीत मालमत्ता कराच्या एकूण रकमेवरच किमान ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.तसेच अभय योजनेचा लाभ घेण्याची मुदत सध्या १५ मार्च २०२६ पर्यंत देण्यात आलेली असली तरी अनेक नागरिकांना या योजनेची माहिती उशिरा मिळाल्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून सदर योजनेची मुदत वाढवून ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे दरम्यान, या मागणीसाठी नगर परिषद अचलपूर येथे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अचलपूर शहर काँग्रेस अध्यक्ष श्रीकांत झोडपे, ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, सचिदानंद बेलसरे, राहुल गाठे, विशाल खानझोडे, अरविंद नेतनराव, नगरसेवक असलम वंजारा,कदीर पहेलवान, राजीक भाई, जलील पठाण,प्रमोद कांबळे, संजय समुद, एस के शाहरुख, अब्दुल मुजीब, ऐजाजखान,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
