
शेतकऱ्यांची वाहतूक ठप्प
तिवसा / तालुका प्रतिनिधी
तिवसा तालुक्यातील मौजा दापोरी खु. ते निभारणी पांदण रस्त्यावर असलेला नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे पूर्णतः वाहून गेला आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांची ये-जा व वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. दापोरी खु. गावातील सर्व शेतकरी बांधव यांनी तहसीलदार तिवसा यांच्याकडे निवेदन सादर करून या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सदर पूल व रस्ता केवळ एक वर्षापूर्वीच खडीकरण करून तयार करण्यात आला होता. मात्र यावर्षीच्या मुसळधार पावसाने नदीला मोठा पूर आला असून, त्यामुळे हा पूल पूर्णतः वाहून गेला आहे. शेतकरी वर्गासाठी हाच एकमेव मुख्य मार्ग असल्याने त्यांना शेतामध्ये ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे.
या रस्त्याचा वापर दापोरी खु. व निभारणी परिसरातील शेकडो शेतकरी दररोज करत असतात. आता पर्यायी मार्ग नसल्यामुळे शेतकरी, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून तातडीने नवीन पूल बांधणीचे नियोजन करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.तातडीने नवीन पूल बांधण्याचे नियोजन करावे पर्यायी रस्ता विकसित करावा यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीसंदर्भात मदत जाहीर करावी.आणि शासनाने व संबंधित विभागाने याबाबत त्वरित निर्णय घेत जनतेची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे निवेदनावर स्वामीय राऊत,नितीन काटोलकर,उमेश राऊत ,मंगेश खरासे,श्रीरामजी खरासे ,हरिभाऊ राऊत ,पंजाबराव राऊत, सतिश नरसिंगपुरे,छाया राऊत,रामचंद्र राऊत,तुषार गोहत्रे – निलेश खरे,मुकुंद पखाले,शरद वावरे ,अनिल नांदणे,नंदु नांदणे, निलेश खरासे,जनार्दन खरात चरणदास खरासे ,गजानन खरासे,पंजाब राऊत आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.