दर्यापूर / रामेश्वर माकोडे
मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यासह राज्यातील शेतकरी व शेतमजुरांचे अतोनात हाल झाले आहेत. रोजगाराचे साधन नाहीसे झाल्याने अनेक कुटुंबांना मुलांचे शिक्षण सुरू ठेवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेची फी माफ करावी, अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मेळघाट क्षेत्र अमरावती ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नकुल सोनटक्के यांनी केली आहे.यासंदर्भात नकुल सोनटक्के यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले. त्यांनी म्हटले की, “ओला दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या घरातील मुलांना परीक्षेचे फॉर्म फी भरणे शक्य होत नाही. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून शासनाने तातडीने फी माफीचा निर्णय घ्यावा.”विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी नकुल सोनटक्के यांनी केलेली ही मागणी योग्य असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह पालकवर्गातून व्यक्त केली जात आहे.
