
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
स्व.रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे स्मारक विद्यापीठ परिसरात करण्यात येत आहे.पुतळा,आर्ट गॅलरी आणि सभागृहाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. स्मारकाची कामे गतीने पूर्ण करून एकाचवेळी संपूर्ण स्मारक लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.यावेळी बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता रूपा गिरासे, कार्यकारी अभियंता श्री. गिरी यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे स्मारकाशी संबंधित वास्तू विशारद, शिल्पकार आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, स्मारकांच्या अंतर्गत असणारा पुतळा तयार करण्यासाठी गवई यांच्या कुटुंबियांना सोबत घ्यावे. त्यांच्या सांगण्यानुसार सुधारणा करावी. पुतळ्याचे क्ले मॉडेल तयार आहे. हा पुतळा कला संचालनालयाकडून तपासून घ्यावा. तसेच शासकीय पातळीवर लागणाऱ्या सर्व परवानगी आणि पुतळा बसविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची पाहणी करावी.
पुतळा हा साधारणत: 15 फुट उंचीचा राहणार असल्याने यासाठी आवश्यक बांधकामाची पाहणी करून पुतळा बसविण्यात यावा. आर्ट गॅलरीमधील छायाचित्र, तसेच गवई यांना प्राप्त झालेले पुरस्कार, सन्मान याबाबत कुटुंबियांची मदत घेऊन उत्कृष्टपणे स्मारकाच्या ठिकाणी प्रदर्शित करावे.स्मारकाचे संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. यावर प्रकाशित करण्यात येणारा मजकूर बारकाईने वाचावा. व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या चुका होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यात तज्ज्ञांची मदत घेतली जावी. आवश्यकता भासल्यास कुटुंबियांकडून मजकूर तपासून घ्यावे. याठिकाणी सोलार आणि वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती कामे तातडीने करून घ्यावी. स्मारकासाठी लागणारा संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्मारकाच्या निर्मितीचे काम गतीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.