नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘रमजान ईद’ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर, नांदगाव खंडेश्वर येथील ईदगाह मैदानाची स्वच्छता करून तेथे आवश्यक नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.रमजान ईदच्या दिवशी शहरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी एकत्र येतात. मात्र, सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून ठिकठिकाणी कचरा साचलेला आहे. ही अस्वच्छता पाहता भाविकांची गैरसोय होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन सौ. प्रांजली गुल्हाने यांनी नगर पंचायत प्रशासनाला पत्र देऊन गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

निवेदनातील मुख्य मागण्या:
ईदगाह परिसरातील वाढलेले गवत काढून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी.
परिसरात जंतुनाशक फवारणी व ब्लिचिंग पावडर टाकण्यात यावी.
नमाजसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि पुरेशा प्रकाशदिव्यांची सोय करावी.
मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावरील अडथळे दूर करून रस्ता सुस्थितीत करावा.
“सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ईदपूर्वी ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत,” असे आवाहन नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांनी केले आहे. या निवेदनामुळे आता नगर पंचायत प्रशासन स्वच्छतेच्या कामाला किती वेगाने गती देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
