
२८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील मालमत्तेच्या चोरीच्या गुन्ह्यांबाबत तत्काळ दखल घेऊन संबंधित गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना सर्व ठाणेदारांना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षम पथकाने एका चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत आरोपीस अटक केली आहे.दि. 26 जुलै 2025 रोजी शिरजगाव कसबा येथील रमादेवी चौकात देशी दारू दुकानात झालेल्या चोरीबाबत तक्रारदार हरीश लक्ष्मणराव गायकवाड (वय 40) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गायकवाड हे अमित जयस्वाल (रा. परतवाडा) यांच्या देशी दारू दुकानाचे व्यवस्थापक असून, त्यांनी 25 जुलै रोजी रात्री 10 वाजता दुकान बंद केले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दुकान उघडले असता, दुकानातून 08 ते 10 देशी दारूच्या पावट्या (कींमत 800 रुपये) आणि रोख 2000 रुपये (10, 20 व 50 रुपयांच्या नोटा) असा एकूण 2800 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेलेला आढळून आला.या प्रकरणात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कसून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपी गजानन वासुदेवराव निर्मळे (वय 25, रा. इंदिरा नगर, शिरजगाव कसबा) याचे नाव पुढे आले. दि. 31 जुलै 2025 रोजी त्यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.ही यशस्वी कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अचलपूर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्र गवई, पोलीस अंमलदार अमोल कपले, मिलिंद इंगोले, दीपक गवई, सुमेध इंगळे आणि योगेश बर्वे यांच्या पथकाने केली.पोलीस विभागाच्या या तत्परतेचे परिसरात कौतुक होत आहे.