
रविवारला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पण सोहळा.
मोर्शी / संजय गारपवार
स्थानिक विश्रामगृह येथे मोर्शी विधानसभेचे आमदार उमेश यावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 1 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली. आमदार यावलकर यांनी माहिती देताना सांगितले की,शहरातील अप्पर वर्धा वसाहतीच्या ४.०८ हेक्टर जागेवर साकारणार २६५ कोटी रूपयांचे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय
महाराष्ट्र राज्यातील चौथे आणि पश्चिम विदर्भातील पहिले, विदर्भातील दुसरे नविन शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी शहरातील बसस्थाकाच्या मागील अप्पर वर्धा वसाहतीत निर्माण होणार आहे. रविवार दि.३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या इमारतीचा भुमीपुजन व लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, दुग्धविकास मंत्री अतुल सावे, मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या जिल्ह्यातील खासदार व विदर्भातील विविध आमदारांच्या प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मोर्शी येथील अप्पर वर्धा वसाहतीमधील ४.०८ हेक्टर जागा ही इमारत बांधकामास आवश्यक असल्याने सदर जागा जलसंपदा विभागाने पशू व मत्स्य विद्यापीठ, नागपूरला हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेवर शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने २६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी भोई समाजातील विविध मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हार अर्पण करण्यात येणार आहे. तरी महिला, पुरुष यांनी मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री गणांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे तसेच या सोहळ्याला नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. वरूड मोर्शी मतदार संघातील भाजपाच्या सर्व विंगच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन आ.उमेश यावलकर यांनी केले आहे.गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी दमयंती नदीला आलेल्या महापुरामुळे दमयंती नदीचे पुराचे पाणी नागरी वस्तीत घुसल्यामुळे नागरिकांचे करोडो रुपयांची हानी झाली होती. भविष्यात पुरामुळे हानी होऊ नये म्हणून शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या दमयंती नदीच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंत तयार करण्याची मागणी सुद्धा मंत्री महोदय करणार असल्याचे सांगितले.अप्पर वर्धा धरणावर मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेटी देत असल्यामुळे पर्यटन केंद्र म्हणून सदर भाग विकसित करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी दिली.