नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध महसुली अडचणींचे तात्काळ निराकरण
तहसीलदार अश्विनी जाधव यांची सदिच्छा भेट, प्रमाणपत्रांचे वाटप
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर अंतर्गत महसूल मंडळ लोणी येथे दिनांक ७ मार्च २०२६ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” उत्साहात पार पडले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. नागरिकांच्या विविध महसुली अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तसेच शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल नायब तहसीलदार श्री. सदानंद देशपांडे साहेब होते. तर लोणीच्या सरपंच श्रीमती आखरे मॅडम तसेच निवासी नायब तहसीलदार श्री. राठोड साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. सदानंद देशपांडे यांनी महसूल समाधान शिबिराचे उद्दिष्ट स्पष्ट करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या शिबिराचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. अरुण सावरकर यांनी प्रभावीपणे केले. शिबिराच्या शेवटी श्री. अमोल जवंजाळ यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार मानले.या शिबिराला नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदार श्रीमती अश्विनी जाधव यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामुळे नागरिकांना शासकीय सेवा थेट व तात्काळ मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाला श्री. संदीप बागडे, श्री. विक्रांत रामटेके, श्री. निलेश मोहोळ, श्रीमती पूजा बैले, श्रीमती श्रद्धा गुर्जर यांचीही उपस्थिती होती. शिबिरामध्ये महसूल तसेच इतर विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलवर नागरिकांनी व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांची माहिती घेतली व त्याचा लाभ घेतला. नागरिकांच्या विविध समस्यांचे मार्गदर्शन व निराकरण यावेळी करण्यात आले.
