बाशिंग बांधून असणाऱ्याचा झाला हिरमोड
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतांनाच सोमवारचा दिवस चांदूर रेल्वे शहरातील अनेक पुरुष राजकारण्यांसाठी “ब्लॅक मंडे” ठरला. कारण निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण जाहीर केलं, आणि काय आश्चर्य — चांदूर रेल्वे नगरपरिषद अध्यक्षपद ‘खुला (महिला)’ या वर्गात गेलं!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारात उभ्या आहेत आणि सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची घोषणा करताच चांदूर रेल्वेतील राजकीय वातावरणात अक्षरशः “धुरळा” उडाला! यावेळी चांदूर रेल्वे नगरपरिषद अध्यक्षपद ‘खुला महिला’ प्रवर्गासाठी राखीव ठरलं आहे. ज्या-ज्या पुरुषांनी मागच्या काही महिन्यांपासून गणवेश इस्त्री करून ठेवले होते, बॅनर डिझाईन केले होते, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर अचानक “सिस्टम एरर” झळकलं! “गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले नवरदेवाचे कसे होईल?” असं म्हणत अनेकांची राजकीय स्वप्नं धुळीला मिळाली.

आता मात्र शहरातील महिला नेत्यांचा आत्मविश्वास चढता आहे. अनेकांनी “मायकांचे युग आलं” असं म्हणत पोस्टर डिझाईन सुरू केली आहे. काहीजणींचे पती मात्र शांतपणे बघत आहेत – कारण आता “घरातही बायको नगराध्यक्षा, आणि शहरातही!” राजकीय वर्तुळात या आरक्षणावर जोरदार चर्चा रंगली आहे. एकेकाळी मंचावर जोशात भाषणं करणारे तथा सतत बॅनरबाजी करणारे पुरुष आता चहाच्या टपरीवर “आपलं नशिबच असं !” म्हणत कप कप चहा पीतायत. आता पुढचा प्रश्न असा – चांदूर रेल्वे नगरपरिषदेत खरोखर ‘महिला राज’ येतो का, की पुरुष पुन्हा कुठला तरी ‘बॅकडोअर प्लॅन’ आखतात? उत्तर येईल लवकरच… पण सध्या तरी शहरात घोषणा एकच – “बायकांचा जय, राजकारणावर विजय!”
यांचा झाला हिरमोळ ?
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी बच्चू वानरे, हर्षल वाघ, गणेश रॉय, नितीन गवळी, सचिन जयस्वाल, प्रसन्ना पाटील, शिट्टू सुर्यवंशी हे इच्छुक असल्याचे जनतेतील चर्चेतून समजते. मात्र नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिला प्रवर्गातील आल्याने सदर इच्छुकांचा हिरमोळ झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे आता हे नगराध्यक्षऐवजी नगरसेवक पदासाठी नशीब आजमावू शकतात.
