
2.30 किलोमीटर अंतर पूर्ण करत स्वप्नाला दिलं यशस्वी मूर्त स्वरूप
चांदूरबाजार / एजाज खान
चांदूरबाजार येथील फिजिकल अकॅडमीत सातत्याने सराव करत असलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मोठं यश मिळवलं आहे. सक्षम सुयोग गोरले या नावाजलेल्या चिमुकल्याने तब्बल 2.30 किलोमीटरचे अंतर पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.सक्षमने गेल्या 7 महिन्यांपासून नियमित फिजिकल सराव करत स्वतःला सिद्ध केलं. बालवयात असतानाही त्याने सातत्य, संयम आणि कठोर परिश्रम यांचा अनोखा संगम साधून स्वतःपुढे ठेवलेलं स्वप्न साकार केलं.
सरावाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या अंगी असलेली कणखरता, धैर्य आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.या यशाबाबत बोलताना सक्षमचे वडील म्हणाले,ही केवळ एक दौड नव्हती ही होती एका स्वप्नपूर्तीची वाटचाल. माझ्या मुलाने दाखवून दिलं की वय काहीही असो, जिद्द आणि प्रयत्न असतील, तर कोणतेही ध्येय गाठता येते. मला त्याचा सार्थ अभिमान वाटतो.चांदूरबाजार फिजिकल अकॅडमीतील प्रशिक्षकांनीही व सर्व कबड्डी खेळाडू यांनी सक्षमच्या या यशाचे भरभरून कौतुक केले.या प्रेरणादायी यशामुळे इतर मुलांनाही मोबाईल पासून दूर राहून फिजिकल करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.