
माहूरच्या उखळी घाटात रक्षाबंधनाच्या दिवशी दुर्घटना; यात्रेत अपघातांची मालिका कायम
माहूर / संजय घोगरे
नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनाच्या दिवशी माहूरगडावर देवदर्शनासाठी आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथील भाविकांच्या ऑटोला मालवाहू पिकअपची समोरासमोर भीषण धडक होऊन एकाचा मृत्यू झाला.तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. हा अपघात आज सकाळी सुमारे 10 वाजता पुसद रोडवरील उखळी घाटात झाला.
भाविकांचा प्रवास आणि भीषण धडक
परिक्रमा यात्रेत सहभागी असलेले विजय पंजाब थोरात (25), अर्जुन प्रकाश हुडे (30), सुनिल महादेव शिंदे (30), युवराज संजय शेंडे (22), राजेश सुभाष राठोड (40) व संतोष सिताराम गादेकर (45) हे सहा भाविक तीनचाकी ऑटोतून माहूरगडावरून परतत असताना, समोरून येणाऱ्या एमएच 26 ए डी 6340 क्रमांकाच्या पिकअप वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिली.धडकेत ऑटोतील सर्वजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने 108 रुग्णवाहीकेद्वारे माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एकाचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे
वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विपिन बाभळे, डॉ. अभिजित अंबेकर, नर्सिंग अधिकारी दत्ता पालटवार, मुधोळकर व मिना शिवशेटी यांनी तातडीने प्रथमोपचार करून गंभीर जखमींना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवले.दरम्यान, अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या अर्जुन प्रकाश हुडे (30) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
यात्रेदरम्यान अपघातांची साखळी
नारळी पौर्णिमा यात्रेच्या काळात माहूरगड परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. स्थानिक नागरिकांनी वाहतूक व्यवस्थापन व सुरक्षा उपाययोजना कडक करण्याची मागणी केली आहे.