
दोन आरोपी गजाआड
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
पोलीस अधीक्षक कार्यालय,अमरावती ग्रामीण अंतर्गत स्थनिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत एका युवकाच्या खुनाचा तपास लावून दोन आरोपींना अटक केली. ही घटना १६ जुलै रोजी बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती.गाव वडाळबाजार रोडवरील नाल्याजवळ एक अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली. मृताचे नाव राकेश ऊर्फ राहुल अशोक तायडे (वय ३१ वर्षे, रा. आयमा नगर) असे असून त्याचे भाऊ रौशन अशोक तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. बेनोडा येथे भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.प्राथमिक तपासात मृत राहुल तायडे याचा मित्र गौरव ऊर्फ सौरभ सोरते (वय २० वर्षे) व गोपाल कुमार (वय २३ वर्षे, दोघे रा. झाशीरी ता. अचलपूर) यांच्याशी वाद झाल्याचे समोर आले. १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास राहुल व वादग्रस्त मित्रांनी गोजेगाव शिवारात एकत्र मद्यपान केले. त्यादरम्यान झालेल्या वादातून आरोपी गौरव व गोपाल यांनी राहुलला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात राहुल बेशुद्ध पडल्यावर त्याच्या डोक्यावर डोक्यावरील बाटलीने घाव घालून त्याचा खून केला.खून केल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याचा मृतदेह गाडीमध्ये टाकून राजूरा बाजार रस्त्यालगत असलेल्या नाल्यात फेकून दिला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृताचा मोबाईल फोन बंद करून पळ काढला.पोलीस अधीक्षक श्री. विक्रांत अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे, पो.उपनिरीक्षक सागर हडवळ, अंमलदार रविंद्र वाकोडे, बबनराव दामधे, गणेश ठाकरे, भूषण पेठे, पंकज फोटे, संजय प्रधान, पो.स्टे. सायगाव येशीलकर, पो.स्टे. बेनोडा येथील गणेशर सपीन, विवेक देशमुख यांनी संयुक्त तपास करून अवघ्या ४८ तासांत आरोपींना अटक केली.पोलीस विभागाच्या या जलद आणि नेमक्या तपासामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असून आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.