अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून विशेष रणनीती आखण्यात आली आहे. या रणनीतीअंतर्गत देशभरातून निवडक कार्यकर्त्यांची प्रचार टीम तयार करण्यात आली आहे.या टीममध्ये महाराष्ट्रातून निवड झालेल्या मोजक्या पदाधिकाऱ्यांमध्ये अमरावती येथील युवा कार्यकर्ते निखिल घुरडे यांचा समावेश करण्यात आला आहे. संघटनात्मक कामातील अनुभव, प्रभावी नियोजनशैली आणि सातत्यपूर्ण सक्रियतेच्या जोरावर पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

निखिल घुरडे हे पश्चिम बंगालमध्ये प्रत्यक्ष कार्यरत राहून बूथस्तरावर संघटन बळकट करणे, स्थानिक कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे, नव्या युवकांना पक्षाशी जोडणे आणि प्रचार यंत्रणा अधिक प्रभावी करणे या जबाबदाऱ्या पार पाडणार आहेत.विशेष म्हणजे, आसनसोल दक्षिण (Asansol Dakshin) या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या मतदारसंघात प्रभावी प्रचार राबवून पक्षाची ताकद वाढवण्यावर त्यांचा भर असणार आहे.

महाराष्ट्रातील युवा नेतृत्वाला मिळालेल्या या संधीमुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राज्याचा ठसा उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
