नांदगाव खंडेश्वर (तालुका प्रतिनिधी)
बडनेरा आगारामध्ये जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात, आनंदाच्या आणि अभिमानाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. कर्तव्य पार पाडत असतानाही महिलांनी या दिवसाचे आनंदाने स्वागत करत आपल्या एकजुटीची आणि सामर्थ्याची जाणीव सर्वांना करून दिली.कार्यक्रमाची सुरुवात महिला कर्मचाऱ्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी महिलांच्या कष्ट, समर्पण आणि कार्यक्षमतेचा गौरव करत त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नृत्य, गाणी, खेळ तसेच मनोरंजनात्मक उपक्रमांमधून महिला कर्मचाऱ्यांनी आपले कौशल्य सादर केले. त्यामुळे संपूर्ण वातावरण आनंदाने आणि उत्साहाने भरून गेले.कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते महिलांनी साकारलेली उभे राहून महिलांनी दिव्यांची आरास करत एकतेचा आणि प्रकाशाचा सुंदर संदेश दिला. या दीपमाला गोलाईत उपक्रमात वैशाली खांडेकर, विद्या मोरे, वैशाली उके, वैशाली वानखडे,पुनम लटवे, वर्षा बावणे, प्रीती बागडे, ज्योती मेटकरी, कांचन सदाफळे, प्रिया गेडाम, सीमा शेंडे, विद्या चव्हाण, छाया खेडकर, अविका यादव, साधना मुंद्रे, सुनीता कवाने, बबिता तुपे, विना मुरेकर, छाया लाटेकर, प्रिया माहुलकर, सरिता पवार, ईंदुरकर , निशीगंधा हिंगें, सविता इंगोले, पदमा पाचघरे, यांसह अनेक महिला कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना साठी कार्यशाळा अधिक्षक देशमुख साहेब,तसेच वाहतूक अधिक्षक भुमिका रोडगे, वाहतूक नियंत्रक मनोज मलातपुरे, संजय श्रीराव, दिनेश शेळके, विनायक मार्कंड,चंद्रशेखर पवार,गजानन पचगाडे आदी अधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तनवी गोलाईत हिने केले. तिच्या आकर्षक शैलीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.महिलांनी एकत्र येऊन साजरा केलेला हा आनंदाचा क्षण बडनेरा आगारासाठी संस्मरणीय ठरला. या निमित्ताने महिलांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला आणि समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे असलेले अमूल्य योगदान अधोरेखित करण्यात आले.
