शेतकरी विलास चोरे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मौजा शिवरा येथील शेतकरी विलास चोरे यांच्या शेतात जाणारा रस्ता पाण्याने वाहून गेल्याने त्यांचा शेतात जाण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन विलास चोरे यांनी नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांच्या कडे दिले.सविस्तर वृत्त असे की गट क्र. ८५ मौजा शिवरा येथे विलास चोरे यांच्या शेतीला लागून एक नाला होता.२०१४ ते २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या आदेशावरून जल युक्त शिवार मधून नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते.

परंतु संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे शेतात जाण्या करिता कुठल्याच प्रकारचा रस्ता ठेवला नाही.त्यामुळे त्यांची शेती ही पडीक राहिली.पैसे नसल्यामुळे चार ते पाच वर्ष रस्ता करता आला नसल्यामुळे व रस्ता उपलब्ध नसल्यामुळे शेतीचे काम करण्यासाठी शेती अवजार, ट्रॅक्टर शेतात जात नसल्यामुळे कुठल्याच प्रकारचे शेतीचे काम होत नव्हते.असे विलास चोरे यांनी या निवेदनात म्हटले आहे.पर्यायी मार्ग म्हणून त्यांनी स्वतःच दगड, माती भरुन रस्ता तयार केला.परंतु दिनांक १६/०८/२०२५ रोजी अतिवृष्टी,ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे त्यांनी केलेला पर्यायी रस्ता पाण्याने पूर्णतः वाहून गेला व रस्ता बंद झाला.त्यामुळे शेतात कुठून व कसे जावे हा मोठा आणि अत्यावश्यक प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.त्यामुळे त्यांच्या पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.त्यामुळे या नुकसानीचे त्वरित पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी व शेतात जायला रस्त्याचा त्वरित बंदोबस्त करून देण्यात यावा. अशी मागणी शेतकरी विलास चोरे यांनी तहसीलदार यांच्या कडे केली.
