
मोर्शी / संजय गारपवार
जगण्याची खरी पुण्याई म्हणजे मृत्यूनंतरही जीवनाची ज्योत पेटवता यावी या उदात्त्य हेतू प्रत्यक्ष कृतीत उतरवत मोर्शी उपजिल्हा रुग्णालय व श्रीराम नर्सिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने “अवयव दान जीवनदान दिन” निमित्याने मोर्शी शहरात जनजागृती रॅली काढून नागरिकांमध्ये अवयव दानाबाबत माहिती देण्यात आली. तसेच जयस्तंभ चौक येथे अवयव दानाविषयी पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात बॅनर आणि घोषणांनी अवयव दान जीवनदान हा संदेश नागरिकांना या मोहिमेतून देण्यात आला.ही मोहीम उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधिकारी, परिसेविका, अधिपरिचारिका, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, श्रीराम नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या उपक्रमामुळे मोर्शी शहरात अवयव दान हा जीवनदानाचा महान संकल्प असा संदेश जनमानसात पोहोचला.