बेशिस्त दुचाकी चालकाला वाचवताना अपघात;नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
अंजनगाव सुर्जी / तालुका प्रतिनिधी
सोमवारी (ता.१६) येथील नवीन बसस्थानक परिसरात सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पांढरी येथील विद्यार्थ्यांना सीताबाई संगई शाळेत सोडत असताना एका बेशिस्त चालणाऱ्या दुचाकी चालकाला वाचविताना विद्यार्थ्यांनी भरलेला ऑटो उलटल्याची घटना घडली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत काही सेकंदात ऑटो उचलल्याने मोठा अनर्थ टळला;मात्र काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली.१०८ या रुग्णवाहिकेला फोन केला असता ती येण्यास वेळ लागणार असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे उपस्थित नागरिकांनी तात्काळ एका खाजगी वाहनातून जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.हे सर्व विद्यार्थी येथील सीताबाई संगई विद्यालय व कन्या शाळेचे असल्याचे समजते.अग्रसेन चौकातील नवीन बसस्थानक परिसरात सोमवारी (ता.१६) पांढरी गावातील एमएच २७ टीसी ४२७ क्रमांकाचा ऑटो शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना समोरून येणाऱ्या एका बेशिस्त दुचाकी चालकाला वाचविताना ऑटो जागीच उलटला.त्यानंतर विद्यार्थ्यांनी एकच किंकाळी फोडली.परिसरातील नागरिकांनी धाव घेत काही सेकंदात ऑटो उचलून बाजूला केला.काही विद्यार्थी ऑटोखाली दबले होते.यावेळी सकाळचे तालुका प्रतिनिधी गजेंद्र मंडलिक यांनी तात्काळ १०८ ला फोन केला;मात्र अंजनगाव येथील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने दर्यापूर येथून रुग्णवाहिका येत असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे उपस्थित नागरिकांनी लगेच एका ऑटोमध्ये विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात पोहोचवले.तेथे प्राथमिक उपचार करून काही गंभीर जखमींना अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.या अपघातात सुशांत रमेश दरोई (वय २३,रा.अंजनगाव सुर्जी),श्रेयस अनिल डाबरे (वय १५),खुशी प्रमोद धुळे (वय १४),सोहम रमेश नेटकर (वय १५) व अक्षय ज्ञानेश्वर करंबे (वय १२,सर्व रा.पांढरी) यांचा समावेश असून इतर विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.दरम्यान,या घटनेच्या वेळी सुरक्षित वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी कोणतेही वाहतूक पोलीस घटनास्थळी उपस्थित नव्हते.
