काँग्रेस, प्रहार आणि भाजपची रणनीती !
नांदगाव पेठ / मंगेश तायडे
अमरावती तालुक्यातील पुसदा जिल्हा परिषद सर्कल नामाप्र सर्वसाधारण राखीव झाला आहे. हा मतदारसंघ पारंपरिकपणे काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश साबळे यांनी या मतदार संघातून विजय मिळवला होता.त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्ते श्याम देशमुख प्रबळ दावेदार असूनही यांनी पक्षनिष्ठा जपत माघार घेतली. पक्ष उमेदवारासाठी मनापासून काम केले. त्यांच्या या त्यागामुळे ते काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांनी आदराचे स्थान प्राप्त केले.मात्र यंदा समीकरणे बदललेली आहेत. प्रकाश साबळे पुन्हा तिकीटाच्या शर्यतीत असतानाच, काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावर मात्र श्याम देशमुख यांच्या नावाला दुजोरा मिळत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या नऊ वर्षांत देशमुख यांनी पक्ष संघटना मजबूत ठेवणे, ग्रामपातळीवर विकासकामे राबवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये एकता टिकवून ठेवणे यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांची शिस्त, संयम आणि संघटन कौशल्य यामुळे कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे.याव्यतिरिक्त काँग्रेस गोटात काँग्रेस चे अमरावती तालुकाध्यक्ष ऍड. अमित गावंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष शैलेश बोंडे आणि जुने निष्ठावान कार्यकर्ते नानासाहेब बोंडे या नावांचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवार निवड ही कठीण परीक्षा ठरणार आहे.प्रकाश साबळे यांनी शेतकऱ्यांची नाळ जोडून ठेवून सर्व घटकांसाठी काम केले त्यामुळे नेमके कुणाला तिकीट मिळणार हा संभ्रम आहे.या सर्वांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे पवन उर्फ छोटू महाराज वसू यांचीही एन्ट्री राजकीय समीकरणे गुंतागुंतीची करत आहे. मागील निवडणुकीत अल्प मतांनी पराभव झाल्यानंतरही छोटू महाराजांनी जनसेवा थांबवली नाही. रुग्णसेवा हे त्यांचे खरे ध्येय असल्याने ते केवळ पुसदा सर्कलपुरते मर्यादित नाहीत तर संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या नि:स्वार्थ आणि अविरत रुग्णसेवेसाठी ते प्रसिद्ध आहेत. रुग्णवाहिका सेवा, रक्तदान उपक्रम, अपघातग्रस्तांना तत्काळ मदत, आणि आरोग्य शिबिरे अशा अनेक कार्यांमुळे त्यांचा समाजात भक्कम जनाधार तयार झाला आहे.म्हणूनच यंदा छोटू महाराज वसू यांना जनतेकडून संधी मिळते का, की इतर पक्षीय उमेदवारांची लाट टिकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.भाजपकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक व कठोरा बु. येथील सरपंच प्रवीण अळसपुरे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. संघटन कौशल्य आणि स्थानिक पातळीवरील प्रभावामुळे भाजपकडून त्यांच्यावर विश्वास दाखवला जाण्याची शक्यता आहे. या सर्कलमध्ये शिंदे गट व अजित पवार गटातील कार्यकर्तेही सक्रिय असले तरी भाजप उमेदवार देणार असल्याने त्यांच्याकडे सध्या अनिश्चिततेचे सावट आहे. एकूणच, पुसदा जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसमध्ये गटबाजी, भाजपमध्ये रणनीती, आणि प्रहार जनशक्ती पक्षाचा सामाजिक प्रभाव अशा त्रिकोणी स्पर्धेची रंगत वाढली आहे. जनतेच्या मनाचा कौल कोणाला मिळणार हे ठरवणारी वेळ आता जवळ आली आहे.पुसदा जिल्हा परिषद सर्कल हा मतदार संघ काँग्रेसकडे अबाधित ठेवण्यासाठी उमेदवार हा अत्यन्त महत्वाचा असणार आहे.प्रकाश साबळे आणि श्याम देशमुख यांच्यात तिकिटासाठी दावेदारी असली तरी पक्षश्रेष्ठी जुन्या उमेदवारावर पुन्हा डाव खेळणार की वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या तसेच जनाधार असणाऱ्या श्याम देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे येणारा काळच ठरवेल मात्र सत्तेत असणाऱ्या भाजपसाठी ही निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही तर जनसेवक उपाधी मिळलेल्या छोटू महाराज वसु यांचे दैनंदिन सेवाकार्य असल्याने त्यांना ही निवडणूक कठीण नाही अशी चर्चा मतदार संघात रंगत आहे..
