रेणुका माता मंदिर समितीकडून सत्कार
माहूर / तालुका प्रतिनिधी
माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असताना पहिल्याच वळणावर पवित्र सेल्फी पॉईंट व श्री दत्त मंदिर परिसर येथे विविध जातीचे पाच झाडे लावून पंचवटी वृक्षारोपण राबविण्यात आले. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा स्तुत्य उपक्रम राबवला. या उपक्रमाचे नेतृत्व माहूरगड तांबूलवाला उर्फ अमोल गावंडे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.गड परिसरातील पर्यावरण संतुलित ठेवणे आणि भाविकांना निसर्गसंपन्न वातावरण उपलब्ध करून देणे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. पंचवटी परिसरात विविध प्रकारची फळझाडे व छायादायी झाडांची लागवड करण्यात आली. यामुळे भविष्यात हा परिसर अधिक हिरवागार होऊन पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.या सामाजिक उपक्रमाची दखल श्री रेणुका देवीचे विश्वस्त दुर्गादास भोपी व मंदिर समितीने घेतली. मंदिर समितीच्या वतीने तांबूलवाला उर्फ अमोल गावंडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मंदिर समितीचे विश्वस्त दुर्गादास भोपी, गावकरी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.या उपक्रमामुळे गड परिसरातील पर्यावरण रक्षणासाठी नवचैतन्य निर्माण झाले असून इतर सामाजिक संस्थांनीही असे उपक्रम राबवावेत, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, भाविक, तरुण मंडळ व अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
