
राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशी संवाद साधणार -डॉ. मनीष गवई
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करण्याकरिता राज्याच्या युवा धोरणाची निर्मिती करण्यात येते महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र राज्यात युवा धोरण, २०१२ च्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अमरावतीचे सुपुत्र तथा भारत सरकार क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतर्राष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मनीष शंकरराव गवई यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून ते आगामी ७ जुलै पासून युवा संवाद दौरा करणार असून या दौऱ्या दरम्यान ते राज्यातील युवकांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी युवकांशी संवाद साधणार आहेत.विशेष म्हणजे ही समिती दर्जा प्राप्त असून राज्यभरातील युवा कार्यक्रमाबाबत ध्येय, उद्दिष्ट व कार्यक्रम अंबलबजावणी करणारी महत्वाची समिती आहे ज्याचे अध्यक्ष खुद्द राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री दत्ता भरणे हे आहेत. त्यांची सामाजिक तथा युवक कल्याण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीवर वरील भरीव कामगिरीला पाहून ही निवड करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक २८. ०५. २०२५ ला आदेश देखील काढला आहे. अनेक वर्षांपासून राज्याच्या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्षम धोरणाची आवश्यकता होती. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ हे धोरण जाहीर केले होते. मात्र, १० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटल्याने, हे धोरण सध्याच्या गरजांनुसार अपुरे पडू लागले होते. त्यामुळे, राज्याच्या युवा धोरणामध्ये सुधारणा करून नवीन धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.नवीन धोरणाच्या निर्मितीसाठी आणि जुन्या धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनाने एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये अनुभवी मंत्री, अधिकारी आणि तज्ञांचा समावेश असून समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्यावर सोपविण्यात आले असून समितीमधील अन्य सदस्यांमध्ये विधान सभा आणि परिषद सदस्य यांच्यासह क्रीडा विभागाचे अपर सचिव, प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय यांचा १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी), कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवोपक्रम विभागाचे १ प्रतिनिधी (उपसचिव/ संचालक/ आयुक्त/ सहसंचालक किंवा यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी) यांचा समावेश करण्यात आला आहे.या समितीला राज्याच्या युवकांचे भविष्य उज्ज्वल बनवण्यासाठी एक मजबूत आणि सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे नवीन धोरण युवकांना शिक्षण, रोजगार, क्रीडा, कौशल्य विकास आणि सामाजिक सहभागाच्या संधी उपलब्ध करून देण्यास मदत करेल.ही समिती येत्या तीन महिन्यात सूचना आणि शिफारसींचा विचार करून नवीन युवा धोरणाचा मसुदा तयार करणार असून हे नवीन धोरण राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान देईल आणि युवकांना आत्मनिर्भर बनण्यास मदत करेल अशी आशा विशेष निमंत्रित समिती सदस्य डॉ मनीष गवई यांनी व्यक्त केली आहे.त्यांसाठी डॉ. मनीष गवई हे ७ जुलै पासून युवा संवाद दौरा उपक्रम राबविणार आहे ज्यात ते महाराष्ट्रातील युवकाशी थेट संवाद साधून चर्चा करणार आहेत आणि राज्याचे सुधारित युवा धोरण कसे असावे याबाबत युवकांच्या माध्यमातून सूचना व प्रस्ताव स्वीकारणार आहेत याबाबत अधिक माहितीकरिता ९३७०१००८९८ वर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे