डॉ.नितीन टाले यांचा प्रस्ताव : इनोव्हेशन अँड स्टार्टअप हब
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परीक्षेत्रातील युवकांना उद्योजकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि स्टार्टअप संस्कृतीला चालना देण्यासाठी सिनेट सदस्य डॉ. नितीन टाले यांनी मांडलेला “नवोद्योजकांकरिता उद्योजकता मार्गदर्शन केंद्र – इनोव्हेशन अँड स्टार्टअप हब” स्थापन करण्याचा प्रस्ताव सिनेट सभागृहात बहुमताने मंजूर झाला. हा निर्णय तरुणाईसाठी अनेक नवे दारे उघडणार आहे.आजच्या काळात फक्त शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या मागे धावणे पुरेसे नाही. उद्योजकता, नवनिर्मिती आणि संशोधन हे रोजगारनिर्मितीचे खरे आधारस्तंभ आहेत. या हबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग प्रकल्पाच्या आखणीपासून ते प्रत्यक्ष उभारणीपर्यंत मार्गदर्शन मिळु शकेल. म्हणजे, तरुण केवळ योजना आखत राहणार नाहीत, तर संपूर्ण स्टार्टअप प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवून शिकतील.

स्थानिक व बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत करार करून उद्योग व व्यवसाय क्षेत्राचे दालन युवकांसाठी उघडले जाणार आहे. या माध्यमातून तरुणांना प्रत्यक्ष उद्योग अनुभव, आवश्यक संसाधने, आर्थिक सहाय्य आणि नेटवर्किंग मिळणार आहेत. यामुळे तरुण स्वावलंबी उद्योजक म्हणून घडण्याची संधी मिळेल.सभागृहाचा हा निर्णय केवळ घोषणा नसून तरुणाईसाठी विश्वासाचा करार आहे. जर प्रशासनाने याची प्रामाणिक अंमलबजावणी केली तर, इनोव्हेशन अँड स्टार्टअप हब केवळ संस्था नाही तर तरुणांच्या स्वप्नांना वास्तवात उतरवणारे व्यासपीठ बनेल.या उपक्रमामुळे अमरावती विभागातील युवकांना फक्त रोजगार मिळणार नाही, तर उद्योजकता, नवनिर्मिती व संशोधनाच्या नव्या क्षितिजांचा अनुभवही लाभेल. भविष्यातील स्टार्टअप संस्कृतीसाठी हा निर्णय निश्चितच ऐतिहासिक ठरेल.
