
ग्रामीण पोलिसांनी गुन्ह्याचा तपास लावणे होणार सुलभ
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 अंतर्गत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई (गृह विभाग) यांच्यावतीने अमरावती ग्रामीण पोलीस घटकास अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन व सहा तज्ञांचे पथक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अमरावती ग्रामीण भागातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल होणाऱ्या गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासात आता हे तज्ञ घटनास्थळी जाऊन थेट भौतिक, रासायनिक, जैविक तसेच संगणकीय स्वरूपातील पुरावे गोळा करतील. यामुळे गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रक्रियेला अधिक वेग व शास्त्रीय आधार मिळणार आहे.सदर फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्यावश्यक रसायने, अत्याधुनिक उपकरणे व वैज्ञानिक साधनसामग्री पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये केमिकल अॅनालायझर, जैविक नमुने गोळा करण्याची साधने, फिंगरप्रिंट स्कॅनर, डिजिटल पुरावे संकलनासाठी लागणारी यंत्रणा तसेच प्रशिक्षित सायंटिफिक असिस्टंट नियुक्त करण्यात आले आहेत.
या तज्ञ पथकाची सेवा अमरावती ग्रामीण पोलीस विभागासाठी 24 तास उपलब्ध असणार आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील पुरावे गोळा करण्याकरिता आयका युनिट मधील विशेष प्रशिक्षित पोलीस अंमलदारांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता, फॉरेन्सिक विज्ञानाच्या मदतीने अधिक अचूक व तांत्रिक तपास शक्य होणार आहे.या उपक्रमामुळे गुन्हे तपासात पारदर्शकता येणार असून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून न्यायप्रक्रिया अधिक मजबूत होईल, असा विश्वास अमरावती ग्रामीण पोलीस विभागाने व्यक्त केला आहे.