
१३ लाखांचा अवैध गुटखा जप्त
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई करत १३.२१ लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील गुटखा तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतत पथक तयार करून गुप्त माहितीवर आधारित कारवाया करण्यात येत आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक १९ जुलै रोजी मोर्शी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, मोर्शी ते वरुड रस्त्यावरून एका काळ्या रंगाच्या इर्टिगा कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा अवैधरित्या वाहतूक करून आणला जाणार आहे. यानंतर पोलिसांनी तत्काळ माळू नदी पुलाजवळ सापळा लावला.थोड्याच वेळात संशयित इर्टिगा गाडी आल्यानंतर पोलिसांनी तिची तपासणी केली असता कारमध्ये दोन इसम आढळले. चालकाने आपले नाव हाफिज खान साहेब खान (वय ४२, रा. माहूली जहागीर) असे सांगितले. पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता कारमध्ये सुगंधी गुटखा आणि तंबाखू असा एकूण ३,७१,२५० रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला. याशिवाय, वाहतुकीसाठी वापरलेली काळी इर्टिगा कार (किंमत ९,५०,००० रुपये) देखील जप्त करण्यात आली. एकूण जप्त मालमत्ता १३,२१,२५० रुपयांची आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखडे, पो.उपनिरीक्षक विशाल रोकडे व त्यांच्या पथकातील पोहवा संतोष तेलंग, पो.शि. राजेश कासोटे, पो.शि. मारोती वैद्य,पो.शि. रमेश मुंडे, पो.शि. प्रदीप ईपर,चालक किशोर सुने, तसेच मोर्शी ठाणेदार पो.नि.सुरज बोंडे व डीबी पथक यांनी केली.