अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
शहरातील वाढत्या अंमली पदार्थांच्या व्यवहारावर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अरविंद चांवरिया यांनी पदभार स्वीकारताच “नशामुक्त अमरावती” हा संकल्प केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलिसांनी सलग मोठ्या कारवाया करून अनेक ड्रग्ज तस्करांना गजाआड केले आहे.तथापि, काही दिवसांपासून पुन्हा नशेच्या व्यवहारात वाढ होत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई करत एम.डी. ड्रग्जचा डिस्ट्रीब्युटर नागपूरमधून जेरबंद केला. या आरोपीचे नाव फैयाज अलतमश अहमद कुरैशी असे असून तो नागपूरसह अमरावती आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये एम.डी. ड्रग्जचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे.एम.डी. ड्रग्ज हा अत्यंत घातक व आरोग्यासाठी धोकादायक पदार्थ असून त्याचा तरुण पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. या अटकेमुळे शहर पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.लक्षात घेण्याजोगे म्हणजे, केवळ पंधरा दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्त अरविंद चांवरिया यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल दोन कोटी रुपयांच्या नशिल्या पदार्थांना नष्ट करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी अमरावती क्राइम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी संदीप चव्हाण यांनी महेंद्र कॉलनी परिसरातून सुमारे ६ लाख रुपयांचे एम.डी. ड्रग्ज जप्त करून आरोपीला अटक केली होती.या सलग कारवायांमुळे अमरावती पोलिसांचा नशाविरोधी अभियानाला मोठे यश मिळत असून, शहराला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
