
खा. बळवंत वानखडे यांच्या अतारांकीत प्रश्नावर ग्रामीण राज्यमंत्री पासवान यांची माहिती
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
देशाच्या विकास प्रक्रीयेमध्ये ग्रामीण विकास महत्वपुर्ण असताे. देशाच्या विकासाला गती देण्याकरीता केंद्र शासानाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे विकास पर निधीची पूर्तता प्रत्येक राज्याला हाेत असते. महाराष्ट्र राज्यालाही सदर निधीची पूर्तता करण्यात आली असून मागील तीन वर्षांमध्ये राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला प्रधानमंत्री ग्रामीण सडक याेजनेअंतर्गत निधी वाटप केले आहे. याबाबत खा. बळवंत वानखडे यांनी लाेकसभेत अतारांकीत प्रश्न ३८१ द्वारे अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते विकासाबाबत व निधीची माहिती घेतली.
खा. बळवंत वानखडे यांनी २२ जुलै राेजी लाेकसभेत एक अतारांकीत प्रश्न क्रं. ३८१ द्वारे ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांना प्रधानमंत्री ग्रामीण सडक याेजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जिल्हा निहाय निधी वाटप बाबत माहितीपर प्रश्न विचारला. ज्यामध्ये गेल्या तीन वर्षात आणि चालू वर्षात प्रधानमंत्री ग्राम सडक याेजना अंतर्गत रस्ते बांधकामासाठी वाटप केलेल्या आणि वापरलेल्या रकमेचा जिल्हावार तपशील, पीएमजीएसवाय अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी काही वेळ मर्यादा आणि गेल्या तीन वर्षात आणि चालू वर्षात, विशेषतः महाराष्ट्रात, पीएमजीएसवाय अंतर्गत बांधलेल्या रस्त्यांच्या लांबी (किमी मध्ये) तपशील याबाबत माहिती मागीतली. यावर राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी सांगीतले की, प्रधानमंत्री ग्रामीण सडक याेजने अंतर्गत राज्य सरकार जिल्हा आणि उपजिल्हा पातळीवर हे निधी वाटप करते. पीएमजीएसवाय अंतर्गत, राज्यांना त्यांच्या मंजूर कामांच्या आधारावर तसेच मागील वर्षाच्या निधीतून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अप्रयुक्त शिल्लक आणि कार्यक्रम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन या आधारावर निधी वाटप केला जात आहे. २०२१ मध्ये 2,708.72 काेटी रूपयाचा निधी वाटप करण्यात आले आणि २०२२-२३ ते २०२५-२६ (16.07.2025 पर्यंत) या आर्थिक वर्षात राज्याने ४,४४५.६५ काेटी रुपये (राज्याच्या वाट्यासह) खर्च केला आहे.
अपुरा निधी : खा. बळवंत वानखडे
पंतप्रधान ग्रामीण सडक याेजने अंतर्गत केंद्र शासनाने ४ हजार ४४५.६४ काेटी रूपयाचा निधी वाटप केला आहे. ज्यामध्ये अमरावती जिल्ह्याला केवळ १३६.८५ काेटी रू. चा निधी मिळाला आहे. अमरावती जिल्ह्याचा विचार करता हा निधी अपुरा आहे. सध्या राज्य महामार्ग व जिल्ह्यातील प्रमुख शहारांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. शहर ते तालुका व तालुका ते ग्रामीण असे रस्ते विकास पाहता १३६ काेटी रूपयाचा निधी अपुरा ठरणारा आहे. याबाबत आपण राज्य व केंद्र शासनाला अमरावती जिल्ह्यातील रस्ते विकासाची माहीती देत अतिरिक्त निधी प्राप्त करण्यावर भर देणार असल्याचे मत खा. बळवंत वानखडे यांनी व्यक्त केले.