६ ते १२ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन – राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांचे निर्देश
अमरावती /उत्तम ब्राम्हणवाडे
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासनात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविणे या उद्देशाने अमरावती विभागात ६ ते १२ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘माहिती अधिकार सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावतीचे राज्य माहिती आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी या संदर्भात परिपत्रक जारी करून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व सार्वजनिक प्राधिकरणांना सप्ताहाचे प्रभावी आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत.दरवर्षी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार माहिती अधिकार सप्ताह साजरा केला जातो.

यावर्षीही अमरावती विभागात हा सप्ताह उत्साहात पार पडणार असून, माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती व नागरिक सहभाग वाढविणे हा त्यामागील प्रमुख हेतू आहे.सप्ताहाच्या काळात शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये माहिती अधिकार विषयावर आधारित पथनाट्ये, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे, तसेच कार्यशाळांचे आयोजन होणार आहे. तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रबोधनपर व्याख्याने व चर्चासत्रे घेण्यात येतील.

माहिती अधिकाराचा वापर करून व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवणाऱ्या नागरिक व अधिकार्यांच्या यशोगाथाही मांडल्या जाणार आहेत. या उपक्रमांना स्वयंसेवी संस्था, रोटरी क्लब, लॉयन्स क्लब आदींचे सहकार्य घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सप्ताहानिमित्त प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ (१)(ख) नुसार त्यांच्या संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर १७ मुद्यांची अद्ययावत माहिती प्रसिद्ध करावी. प्राप्त अर्ज व अपिले विहित मुदतीत निकाली काढावीत. शास्तीची प्रकरणे तातडीने हाताळून त्यांचे अहवाल आयोगाकडे पाठवावेत, अशा सूचना आयोगाने दिल्या आहेत.

रवींद्र ठाकरे म्हणाले, “माहितीचा अधिकार हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असून, प्रशासन पारदर्शक व जबाबदार ठेवण्याचे प्रभावी साधन आहे. प्रत्येक नागरिकाने या अधिकाराचा योग्य उपयोग करून शासनाच्या कार्यप्रणालीत सहभाग वाढवावा. माहिती अधिकार सप्ताह हे जनजागृतीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे आणि प्रत्येक शासकीय कार्यालयाने या उपक्रमात उत्साहाने भाग घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, प्रगतीशील शेतकरी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी योग्य नियोजन करून विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती वाढवावी. तसेच अनुकरणीय उपक्रमांची माहिती राज्य माहिती आयोगाला सादर करावी, असे निर्देशही परिपत्रकात देण्यात आले आहेत.
सप्ताहाचा शुभारंभ ६ ऑक्टोबर रोजी
या दिवशी विविध शासकीय कार्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये उपक्रमांचे आयोजन करून माहिती अधिकाराच्या प्रचाराची सुरुवात करण्यात येणार आहे.
