रेवसा येथे पेढी नदीच्या पात्रात लाडक्या गणरायाला निरोप.
अमरावती / सचिन ढोके
गेल्या दहा दिवसांपासून भाविकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लाडक्या गणरायाच्या विसर्जन सोहळ्याने अमरावतीत उत्साहाची उधळण केली. पहाटेपासूनच शहर व परिसरातील विविध गणेश मंडळांच्या मिरवणुकींना सुरुवात झाली होती. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, आकर्षक सजावटीच्या रथांवर गणेशमूर्तींना विराजमान करून भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या घोषणांनी शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले.

मुख्य विसर्जन घाटांसह विविध कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळली होती. प्रशासनाने सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिस दलाची विशेष तुकडी तैनात केली होती. स्वच्छतेसाठी महापालिकेकडून पथकांची नियुक्ती करण्यात आली.शहरातील काही मंडळांनी पर्यावरणपूरक विसर्जनाची संकल्पना राबवत मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये केले. विसर्जन मिरवणुकींमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, लेझीम पथके आणि ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.

भाविकांच्या जयघोषात आणि भक्तिभावाच्या वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
