
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यात कृषी प्रक्रियावर आधारीत प्रशिक्षणाला वाव आहे. त्यामुळे जिल्हा कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षणाचे कार्य राबविताना युवकांना रोजगार मिळेल, असे कृषी आधारीत प्रशिक्षणावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभागाच्या विविध प्रशिक्षण योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा कौशल्य विकासाचा आराखडा आज सादर करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, परिविक्षाधिन अधिकारी कौशल्या, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा कौशल्य विकासच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, राज्य शासनाची महत्वाची असलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आली. सध्या 11 महिन्यांसाठी नेमलेले युवक कार्यरत आहेत. त्यांना त्यांचे विद्यावेतन नियमित मिळतील, याची दक्षता घ्यावी. यासोबतच विविध रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना रोजगार प्राप्त करून देण्यात येत आहे. हे युवक कामावर असल्याचा नियमित आढावा घेण्यात यावा. प्रशिक्षणाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यातून चांगला कायमस्वरूपी रोजगार मिळेल, अशी प्रशिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात यावी.प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी मिळणे महत्वाचे आहे. यासाठी कृषी क्षेत्रासोबतच सध्या सौरऊर्जेवर आधारीत सोलार रूफटॉप, सोलार पंप आदी सामुग्री दुरूस्तीचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी. तसेच इलेक्ट्रीक वाहनांचाही वापर वाढलेल्या असल्याने या वाहनांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा. यासोबत जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारण या मेळघाट भागातील युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थांची नोंदणी करावी. जिल्ह्याच्या गरजेनुसार प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या.शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमात जिल्हा कौशल्य विभागाच्या अमरावती कार्यालयाने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला. यात योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.