भंते करुणानंद महाथेरो यांच्या सुमधुर वाणीतील धम्म प्रबोधनाने पिंपळगाववासी मंत्रमुग्ध.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
पिंपळगाव निपाणी नगरीत नव भीम ज्योत मंडळ, रमाई महिला मंडळ आणि कुशावती सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य दिव्य दोन दिवसीय विशाल धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला परिसरातील तसेच राज्यभरातील भिक्षू संघ आणि धम्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेचे उद्घाटन औरंगाबाद येथील भंते करुणानंद महाथेरो यांच्या हस्ते झाले. त्यांच्या सुमधुर व प्रभावी वाणीतील धम्म प्रबोधनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. या परिषदेस अखिल भारतीय भिकू संघाचे अनेक भिक्षू उपस्थित होते. भंते दर्मा (ऑस्ट्रेलिया), भंते नागसेन थेरो (इंदोर), सारीपुत्र आनंद भंते (वटफळी), भंते पट्टीसेन (नांदेड) तसेच यवतमाळ येथील भंते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. परिषदाध्यक्ष म्हणून कीर्ती आनंद बोधी यांनी जबाबदारी पार पाडली.

या सर्व भंतेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत आंबेडकराईट बुद्ध आणि धम्म यांचे महत्त्व पटवून दिले. “मी साहेबांची रामू बोलते” या एकपात्री प्रयोगातून आम्रपाली बोलके यांनी उपस्थितांना भावनिक केले. तसेच अरुण भाऊ बनकर यांच्या वतीने धम्मदानासाठी जाणाऱ्या महिलांना माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले.राष्ट्रीय प्रबोधनकार प्रकाशनाथ पाटणकर यांनी गीत गायनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. दुसऱ्या दिवशी रमाई जयंतीनिमित्त भव्य धम्म रॅली काढण्यात आली. महिलांच्या हस्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमा घेऊन, रथ व डीजेच्या साथीत संपूर्ण गावातून ही रॅली उत्साहात पार पडली.दुपारच्या सत्रात धम्मतत्त्वावर आधारित व्याख्यानमाला पार पडली. यामध्ये चंद्रमणी गणवीर, अरुण बनकर, वासेकर साहेब (अमरावती), संध्या गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता प्रा. डॉ. विद्याताई राइकवार यांनी प्रभावी भाषण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आदी महामानवांच्या विचारांवर प्रकाश टाकला.

रात्री नऊ वाजता भीम गीतांच्या माध्यमातून वैचारिक सामना रंगला. नागपूरचे सुरज आतिश संच आणि उत्तर प्रदेशच्या करिष्मा ताज पार्टी यांच्यात भीम गीतांवर आधारित सादरीकरण झाले. दोन्ही दिवस मंडळातर्फे रात्री १० वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.या दोन दिवसीय धम्म परिषदेची सर्वत्र चर्चा होत असून, कार्यक्रमाच्या यशात पिंपळगाव निपाणी येथील महिलांचा सर्वात मोठा वाटा राहिला. नव भीम ज्योत मंडळ, रमाई महिला मंडळ आणि कुशावती सामाजिक प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. तसेच गावातील उपासक-उपासिकांनीही मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते ओम प्रकाश पाटील यांनी केले, तर मंडळाच्या वतीने विशाल गजभिये यांनी आभार प्रदर्शन केले.
