भोंदू बाबा अशोक खरात च्या विरोधात माकपचे निदर्शने!
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
बुवाबाजीला शरण जात राज्यातील ३९ आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील झाल्याचे आरोप होत आहेत. अशा आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी व या आमदारांचे राजीनामे घ्यावेत तसेच पीडित महिलांचे समाजमाध्यमांवर वायरल होणारे व्हिडिओ हटविण्यात यावे आणि प्रत्येक पो. स्टे . मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करून क्रियान्वित करावे अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट केली असून या मागणीसाठी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी राज्यव्यापी आंदोलनतर्गत नांदगाव खंडेश्वर बस स्टॉप चौक येथे तीव्र निदर्शने केली व तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली आहे.

निवडून गेलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात. संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता या उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून संविधानाने टाकलेली जबाबदारी पार न पाडणे आहे. अशा लोकप्रतिनिधींच्या निमित्ताने तंत्र-मंत्र, जादू-टोणा इत्यादी अंधश्रद्धेच्या गोष्टींना राजमान्यता मिळत असते. त्यामुळे सामान्य जनताही अशा भोंदू बाबांच्या भोंदूगिरीला बळी पडत असते. भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत तितकेच गुन्हेगार त्यांना समर्थन देणारे, शरण जाणारे व आपल्या अनुयायांना बुवा-बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करीत आहेत.भोंदू बाबा अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे वाईट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचत आहे. असे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटविण्याची कारवाई राज्य सरकारने करावी अशी मागणीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करीत आहे. सोबतच, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अमलात आणा, जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून सदर कायद्याची कठोर अंमलबजावणी करा व सोशल मीडियातून होणाऱ्या बाबा-बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.यावेळेस माकप तालुका सचिव शाम शिंदे, अशोक केसारखाने, विजय पाटील, योगेश महल्ले, दीपक अंबाडरे, राजेंद्र राऊत, प्रभाकर खडसे, दिलीप महल्ले, शत्रुघ्न नगर, लक्ष्मण झिमटे, रामदास मते, नारायण सोनोने, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती बंड, विशाल शिंदे किशोर शिंदे, लालचंद इंगोले, पंदे, यासह आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
