सालोड ग्रामस्थांचा संताप शिगेला
सालोड कसबा/ अंकुश निंमनेकर
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड गावातील ग्रामस्थांनी आज पंचायत समिती कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामसेवक यशवंत जाधव व रोजगार सेवक एकनाथ केबल यांच्या विरोधात तीव्र तक्रार सादर केली असून, दोघांचीही तात्काळ बदली करण्याची ठाम मागणी केली आहे.ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात घरकुल योजनेत गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यांना अपात्र ठरवणे आणि अपात्र व्यक्तींना लाभ देणे, तसेच घरकुल मंजुरीसाठी पैशांची मागणी केल्याचे आरोप ग्रामस्थांनी स्पष्टपणे केले आहेत.तसेच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांच्या कामकाजाबाबतही गंभीर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालयात नियमित उपस्थित नसणे, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष करणे आणि गावकऱ्यांशी अयोग्य वर्तन केल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या सर्व प्रकारांमुळे गरीब व गरजू नागरिकांना मोठा अन्याय सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच ग्रामसेवक यशवंत जाधव व रोजगार सेवक एकनाथ केबल यांची तात्काळ बदली करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
