मांजरी–सावनेर रस्ता खड्ड्यांनी पोखरला
रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करा—नागरिकांची मागणी
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी ते सावनेर हा ५ किलोमीटरचा महत्त्वाचा मार्ग पूर्णतः जीर्णावस्थेत असून नागरिक, शेतकरी व वाहनधारकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रस्त्याची चाळण झाल्याने अरुंद मार्गावर ठिकठिकाणी गिट्टी बाहेर येऊन रस्ता धोकादायक झाला आहे. बारीक खोल खड्डे पडले आहेत. धुळीचे प्रचंड प्रमाण, उखडलेला टार, वाहने घसरून अपघातांची शक्यता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.स्थानिकांनी सांगितले की, हा रस्ता गाव ते मुख्य बाजारपेठ, देवस्थान, शाळा, दवाखाना तसेच शेतमाल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र दीर्घकाळ रस्ता दुरुस्तीला निधी न मिळाल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. रस्त्यालगत लावलेले दोन भूमिपूजन फलक देखील परिसरातील दुर्लक्ष अधोरेखित करत आहेत. रस्त्याचे काम मंजूर झाल्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात काम अद्याप सुरू झालेले नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.

नागरिकांच्या मतानुसार “दररोज धुळीतून प्रवास करावा लागतो. मोटारसायकल घसरून अनेक अपघात झाले.”“रस्ता इतका अरुंद व खड्ड्यांनी भरलेला की चारचाकी वाहने चालवणे धोकादायक झाले.”याबाबत नागरिकांनी संबंधित विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष घालून पक्के डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.
