राष्ट्रवादी (शरद पवार गट) ला बळकटी
चांदूर बाजार/-सुयोग गोरले
–मोर्शी नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे सक्रिय कार्यकर्ते सतीश मनोहरराव डफळे सर यांची आज अविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे पक्षाला नगर परिषदेत महत्त्वाचे प्रतिनिधित्व मिळाले असून स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याची चर्चा सुरू आहे.मागील निवडणुकीत स्वीकृत सदस्य पदासाठी निवडणूक पार पडली होती; मात्र काही कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य निवडून आला नव्हता. त्यामुळे हे पद रिक्तच राहिले होते. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने ही निवड प्रक्रिया पुन्हा राबविण्यात आली आणि आज अखेर सतीश डफळे सर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.या निवड प्रक्रियेदरम्यान नगराध्यक्ष सौ. प्रतीक्षाताई गुल्हाने यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली, तर मुख्याधिकारी शिवदास मुसळे हे उपस्थित होते. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे गटनेते व उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुहाडे यांनी सतीश डफळे यांचे नाव सुचविले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व भारतीय काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकमताने त्यांच्या नावास मान्यता दिली आणि निवड जाहीर करण्यात आली.सतीश डफळे सर हे विदर्भ कबड्डी क्षेत्रातील परिचित नाव असून ते विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि संघटन कौशल्य यामुळे नगर परिषदेतही त्यांच्या कार्यकाळाकडून अपेक्षा व्यक्त होत आहेत. त्यांच्या निवडीमुळे क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.नियुक्तीनंतर सतीश डफळे सर यांनी कृषिमंत्री व शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष इंडिया सेक्रेटरी गुरुवर्य जितेंद्रसिंह ठाकूर सर, यांचे आभार मानले तर या वेळी उपस्थित सचिव नागपूर ग्रामीण राहुल शेळके, सचिव अकोला शहर राजेंद्र नेरकर, सचिव अकोला ग्रामीण मंगलसिंग ठाकूर, शंकरराव मालठाणे, भारत चिखलकर, राजूभाऊ मेटे, रवी रोहनकर, ऋषीभाऊ कोकाटे, विजय सोलकर, विकासराव नवघरे, हरीशराव हरणे, गौरव धानोरकर, शैलेश गावंडे, प्रशांत चरोडो, सुयोग गोरले तसेच उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी व समर्थकांचे आभार मानले.या प्रसंगी अमॅच्युअर कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी, कबड्डी प्रेमी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवडीनंतर बोलताना सतीश डफळे यांनी मोर्शी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असून क्रीडा क्षेत्राला विशेष प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निवडीमुळे आगामी काळात नगर विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
