चवदार तळे व रायगड भेटीतून कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा
ऐतिहासिक स्थळांना भेट देत संघटन बळकट करण्याचा निर्धार
महाड / प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे नूतन प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांनी आपल्या महाराष्ट्र भ्रमणाची सुरुवात महाड येथून केली. या दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक चवदार तळ्याला भेट देऊन करण्यात आली. क्रांतिभूमी येथे जाऊन त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच भीम सैनिकांसोबत अन्नदान उपक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक महाड येथे पार पडली. बैठकीत बोलताना विश्वजित गायकवाड यांनी राज्यभर दौरा करून संघटनात्मक बळ वाढविण्यासोबत समाजातील दुर्लक्षित घटकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. पूर्वी सरकारविरोधात भूमिका घ्यावी लागत होती, मात्र सध्या देशात आणि राज्यात आपलेच सरकार असल्याने संघटनात्मक बांधणीसोबत समस्यांचे निराकरण करण्यावर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी प्रेरणादायी भाषण केले. “तुम्ही दहा पावले चला, मी शंभर पावले तुमच्या पुढे असेन,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्यांच्या या भाषणामुळे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. कार्यक्रमात व्हीआयपीमध्ये बसलेल्या विश्वजित गायकवाड यांना निवेदिकेने व्यासपीठावर बोलावल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जाताना त्यांचा हात धरून संवाद साधल्याने जबाबदारी आणखी वाढल्याची भावना गायकवाड यांनी व्यक्त केली.

महाड येथील कार्यक्रमानंतर त्यांनी रायगड येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. चवदार तळे आणि रायगड या दोन्ही ऐतिहासिक स्थळांच्या भेटीमुळे मोठी प्रेरणा व ऊर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हीच ऊर्जा घेऊन राज्यभर दौरा करत संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
