राज्याच्या युवकांसाठी नव्या संधी, कौशल्यविकास व धोरणात्मक बदलांवर सविस्तर विचार विनिमय
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
राज्याच्या युवा धोरणाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यासाठी अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार Rohit Pawar यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील युवकांसाठी रोजगार, कौशल्यविकास, उद्योजकता आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.डॉ. मनीष गवई सध्या सामाजिक न्याय मंत्रालयाचे अध्यक्षांचे खासगी सचिव म्हणून कार्यरत असून त्यांना भारत सरकारकडून राष्ट्रीय युवा पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ते महाराष्ट्र शासनाचे विशेष निमंत्रित सदस्य आणि विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही विविध उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत आहेत. युवकांच्या प्रश्नांवर त्यांचा दीर्घकाळाचा अनुभव आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य लक्षात घेता या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.या चर्चेदरम्यान राज्यातील युवकांना शिक्षण, रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन योजना राबविण्याबाबत विचारमंथन झाले. ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांमधील कौशल्यविकासाची दरी कमी करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच युवकांना शासनाच्या योजनांची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे यावरही भर देण्यात आला.आमदार रोहित पवार यांनी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने प्रभावी आणि सर्वसमावेशक युवा धोरण तयार करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. यासाठी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, तज्ञ आणि युवक प्रतिनिधी यांचे मत जाणून घेऊन धोरण अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.दरम्यान, डॉ. मनीष गवई यांनीही युवकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी समन्वय होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. युवकांच्या नेतृत्वगुणांना वाव देणारे उपक्रम वाढविणे आणि त्यांना समाजकार्यात सहभागी करून घेणे हे आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.या भेटीमुळे राज्याच्या युवा धोरणाला अधिक व्यापक दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, आगामी काळात युवकांसाठी ठोस निर्णय घेतले जातील,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
