नांदगाव खंडेश्वर शहरी विभागाचा अभिमान ठरला विद्यार्थी
93.75% गुणांसह एकटाच विद्यार्थी पात्र
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील पत्रकार उमेश चौकडे यांचा मुलगा वीर चौकडे याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. वीर सध्या एकलव्य गुरूकुल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. नुकताच जाहीर झालेल्या नवोदय विद्यालयाच्या निकालात त्याने उल्लेखनीय कामगिरी करत 93.75% गुण मिळवले असून नांदगाव खंडेश्वर शहरी विभागातून त्याची निवड झाली आहे.वीरच्या या यशामुळे त्याच्या शाळेतील शिक्षक, मित्रमंडळी तसेच नातेवाईकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत शहरी विभागातून पात्र ठरणारा तो एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर परिसरासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. वीर चौकडे याने हे यश आपल्या आई-वडील, शिक्षक आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच अभ्यासात सातत्य ठेवता आले आणि परीक्षेत चांगली कामगिरी करता आली, असेही त्याने सांगितले.वीरच्या या यशामुळे एकलव्य गुरूकुल स्कूलमध्येही आनंदाचे वातावरण असून शाळेच्या व्यवस्थापनाने आणि शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
