नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून अविनाश सदाशिवराव ब्राम्हणवाडे (स्वीकृत नगरसेवक) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. संबंधित परिसरातील शंकर बाविस्स्थळे यांच्या घरासमोरील धोकादायक डीपी (डिस्ट्रिब्युशन पॉईंट) स्थलांतर करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वर्षांपासून घरांच्या अगदी जवळ असलेल्या या डीपीमुळे नागरिकांना सतत अपघाताचा धोका निर्माण झाला होता. तसेच घर बांधकाम, दैनंदिन हालचाली आणि परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीनेही मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत अविनाश सदाशिवराव ब्राम्हणवाडे यांनी दिनांक ०४/०३/२०२६ रोजी अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे मागणी नोंदवली होती.या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून डीपी लवकरात लवकर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

याबाबत बोलताना अविनाश सदाशिवराव ब्राम्हणवाडे म्हणाले, “नागरिकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकारच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कायम तत्पर राहणार आहे.”स्थानिक नागरिकांनीही नगरसेवकांच्या या प्रयत्नांचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
